वृत्तसंस्था/ ड्युनेडीन
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संयुक्त यजमानपदाने सुरू असलेल्या फिफाच्या महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत इ गटातील झालेल्या सामन्यात नेदरलँड्सने व्हिएतनामचा 7-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या विजयामुळे स्पर्धेच्या गुणतक्त्यात इ गटातून नेदरलँड्सने आघाडीचे स्थान मिळवले आहे. या स्पर्धेत अमेरिका आणि पोर्तुगाल यांच्यातील सामना गोल शून्य बरोबरीत राहिला असला तरी अमेरिकेने शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले.
हा सामना सुरु होण्यापूर्वी नेदरलँड्सचा संघ इ गटातून गोलसरासरीच्या जोरावर दुसऱ्या स्थानावर होता. अमेरिका पहिल्या स्थानावर होता. अमेरिका आणि पोर्तुगाल यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत राहिल्याने इ गटातून आता नेदरलँड्सचा संघ पहिल्या स्थानावर आहे. या गटात अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे. नेदरलँड्स आणि व्हिएतनाम यांच्यातील सामना एकतर्फीच झाला. आठव्या मिनिटाला नेदरलँड्सचे खाते लिकी मार्टेन्सने उघडले. 18 व्या मिनिटाला इसेमी ब्रुगेट्सने नेदरलँड्सचा दुसरा गोल केला. सामन्याच्या मध्यंतरावेळी नेदरलँड्सने व्हिएतनामवर 2-0 अशी आघाडी घेतली होती. मार्टेन्स आणि कॅटीजा स्नोजी यांनी चार मिनिटांच्या कालावधीत प्रत्येकी एक गोल नोंदवला. आता बाद फेरीत नेदरलँड्सचा प्रतिस्पर्धी ग गटातील बुधवारी होणाऱ्या सामनाच्या निकालावरून निश्चित होईल. ग गटात सध्या स्वीडनचा संघ पहिल्या स्थानावर असून इटली दुसऱ्या स्थानावर आहे. व्हिएतनामचे या स्पर्धेतील पदार्पणातील मार्गक्रमण या पराभवामुळे संपुष्टात आले. आता व्हिएतनामचा संघ 26 ऑक्टोबर रोजी उझ्बेकबरोबर ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या स्पर्धेत लढत देणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात नेदरलँड्स संघाने तिसऱ्यांदा उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
अमेरिका आणि पोर्तुगाल यांच्यातील गोलशून्य बरोबरीत राहिला. या सामन्यात स्टॉपेज कालावधीत पोर्तुगालच्या कॅपेटाचा गोल थोडक्यात हुकला. अमेरिकन महिला फुटबॉल संघाने या स्पर्धेच्या इतिहासात प्राथमिक गटात केवळ एक सामना जिंकला आहे.









