वृत्तसंस्था / मालेगा (स्पेन)
2024 च्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या उपांत्य लढतीत नेदरलँडस्ने जर्मनीचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इटली यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळविला जाणार आहे.
जर्मनी आणि नेदरलँडस् यांच्यातील उपांत्य फेरीच्या लढतीत नेदरलँडस्च्या झेंडस्कल्पने जर्मनीच्या डॅनियल अल्टमेअरचा 6-4, 6-7 (10-12), 6-3 असा पराभव केला. या उपांत्य लढतीत उभय संघात तीन सामने खेळविले गेले. नेदरलँडस्ने दोन सामने जिंकून जर्मनीचे आव्हान संपुष्टात आणले. नेदरलँडस्च्या ग्रिकस्पूरने पहिल्या सामन्यात जर्मनीच्या स्ट्रफचा 6-7 (4-7), 7-5, 6-4 असा पराभव केला. नेदरलँडस्च्या झेंडस्कल्पने स्पेनचा माजी टॉपसिडेड टेनिसपटू राफेल नदालला व्यवसायिक टेनिस क्षेत्रातून निवृत्त होण्यापूर्वीच्या शेवटच्या सामन्यात पराभूत केले होते.









