वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ग्राहकोपयोगी उत्पादने बनवणारी एफएमसीजी कंपनी नेस्ले इंडिया लिमिटेडने पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 24.69 टक्के वाढ नोंदवली असून ती 736.64 कोटी रुपये आहे. उत्पादनांच्या विक्रीतील वाढीमुळे कंपनीला चांगला नफा पदरात पाडणे शक्य झाले आहे.
कंपनीची एकंदर निव्वळ विक्री 20 टक्के इतकी वाढली असून 4,808.40 कोटी रुपयांची राहिली आहे. सदरच्या तिमाहीत नेस्ले इंडियाच्या उत्पादनांची मागणी बऱ्यापैकी वधारलेली राहिली आहे. परिणामी कंपनीला नफ्यातही वाढीव कामगिरी साध्य करणे शक्य झाले आहे, असे कंपनीचे भारतातील चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन यांनी सांगितले आहे.
विकासात सर्वोत्तम कामगिरी
सदरचा कंपनीचा विकास हा गेल्या 10 वर्षातील सर्वोत्तम असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या ताफ्यातील जवळपास सर्वच उत्पादनांनी दोन अंकी विक्रीत वाढ नोंदवली आहे. सलग चार तिमाहीत कंपनीने विक्रीत वाढ दर्शवली आहे. याचदरम्यान मार्चच्या तिमाहीत कंपनीने 20 टक्के वाढीसह 4 हजार 830 कोटींचा महसूल प्राप्त केला आहे. जानेवारी ते मार्चच्या कालावधीत एकूण खर्च 3 हजार 873 कोटी रुपयांचा नोंदला गेला आहे. कंपनीने दुसरीकडे देशांतर्गत विक्रीतही 21 टक्के वाढीची नोंद केली आहे.