प्रतिनिधी/ बेळगाव
‘हे गाव कोणते आहे?’ अशी विचारणा करीत बुडरकट्टी, ता. बैलहोंगल येथील तरुणाला लुटणाऱ्या पाच जणांना नेसरगी पोलिसांनी अटक केली आहे. दरोड्याच्या घटनेनंतर तब्बल आठ महिन्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
इराप्पा महादेव पवाडी (वय 26), मूळचा राहणार हणबरट्टी, सध्या राहणार चन्नम्मानगर-बेळगाव, प्रशांत ऊर्फ परसा रामचंद्र नारी (वय 26), राहणार गुजनाळ, ता. गोकाक, निंगाप्पा ऊर्फ अजय आडव्याप्पा दोडमनी (वय 20), राहणार गुजनाळ, ता. गोकाक, रामप्पा ऊर्फ रमेश बाळाप्पा हळबण्णावर (वय 26), मूळचा राहणार सुनपुंपी, सध्या राहणार राजकट्टी, ता. हुक्केरी, सदानंद ऊर्फ सदाशिव बाळाप्पा उद्दानायक (वय 24), राहणार सुनकुंपी, ता. बैलहोंगल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रुती यांच्या मार्गदर्शनाखाली नेसरगीचे पोलीस निरीक्षक गजानन नायक व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जणांकडून रोकड, तसेच दोन मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या आहेत. अटकेची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
दि. 5 जानेवारी 2025 रोजी राजू आडव्याप्पा शिवबसण्णावर (वय 24), राहणार बुडरकट्टी, ता. बैलहोंगल याने नेसरगी पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध फिर्याद दिली होती. त्याचदिवशी सकाळी 10.30 वाजता मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञातांनी ‘हे गाव कोणते आहे?’ अशी विचारणा करीत आपल्याशी बोलणे सुरू ठेवले. थोड्यावेळात चाकूचा धाक दाखवत आपल्याजवळील निळी
बॅग हिसकावून घेतली. या बॅगेत 29 हजार 70 रुपये रोख रक्कम व 12 हजार रुपये किमतीचा टॅब असे एकूण 41 हजार 70 रुपयांचे साहित्य होते. ते हिसकावून घेऊन मोटारसायकलवरून फरारी झाले होते.









