मायावतींची मोठी कारवाई : पदावरून हटवल्यानंतर 24 तासांच्या आत पक्षातूनही काढले
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मोठी कारवाई करत आपला भाचा आकाश आनंदची बसप पक्षातून हकालपट्टी केली आहे. मायावतींनी रविवार, 2 मार्चला आकाश आनंद याला पक्षाच्या सर्व महत्त्वाच्या पदांवरून काढून टाकले होते. त्यानंतर अवघ्या चोवीस तासांच्या आत सोमवारी पक्षातूनही काढून टाकल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
बसपा सुप्रीमो मायावती यांनी सोमवारी आपला भाचा आकाश आनंदला बसपामधून काढून टाकल्याची माहिती ट्विटद्वारे दिली. तत्पूर्वी बसपाच्या अखिल भारतीय बैठकीत आकाश आनंद यांना राष्ट्रीय समन्वयकांसह सर्व जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यात आले होते. पक्षाच्या हितापेक्षा पक्षातून काढून टाकण्यात आलेले आपले सासरे अशोक सिद्धार्थ यांच्या प्रभावाखाली सतत प्रभाव टाकल्यामुळे आकाश आनंद यांना राष्ट्रीय समन्वयक पदासह सर्व जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यात आले. त्यांनी यासाठी पश्चात्ताप करावा आणि आपली परिपक्वता दाखवावी, असे त्यांनी म्हटले आहे.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाभिमान चळवळीच्या हितासाठी आणि आदरणीय कांशीराम यांच्या शिस्तीच्या परंपरेचे पालन करून आकाश आनंद याला आपल्या सासऱ्यांप्रमाणेच पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी पक्षातून काढून टाकण्यात येत असल्याचेही मायावतींनी स्पष्ट केले आहे.
2 मार्च रोजी लखनौ येथे झालेल्या बसपाच्या राष्ट्रीय पातळीवरील बैठकीनंतर मायावती यांनी एक निवेदन जारी केले होते. पक्षाच्या हितासाठी आकाश आनंद याला त्याच्या सर्व जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यात आले आहे. या कृतीसाठी पक्ष नाही तर त्यांचे सासरे अशोक सिद्धार्थ पूर्णपणे जबाबदार आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले होते.









