भारतावर नाराज असल्याची चर्चा : टेन्शन वाढणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
स्वत:च्या शौर्यासाठी प्रसिद्ध नेपाळचे गोरखा सैनिक आता रशियाकडे वळू लागले आहेत. एका अहवालानुसार मोठ्या संख्येत गोरखा लोक रशियातील खासगी सैन्य वॅगनरमध्ये सामील होत आहेत. युक्रेनच्या युद्धात रशियाच्या वतीने लढणारा वॅगनर ग्रूप काही दिवसांपूर्वी अचानक राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात उतरला होता. अनेक तज्ञांनी वॅगनर ग्रूपला रशियाच्या सैन्याच्या तुलनेत अधिक कुशल आणि क्षमतावान ठरविले आहे. अलिकडेच या ग्रूपने युक्रेनमधील छोटे परंतु सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण बखमुत शहरावर कब्जा केला होता. नेपाळी गोरखा युवक आता वॅगनरमध्ये सामील होत असल्याची चर्चा आहे. 16 मे रोजी रशियाने एक वर्षाच्या सैन्य सेवेनंतर रशियाचे नागरिकत्व प्राप्त करण्याशी निगडित नियम शिथिल करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून शेकडो नेपाळी युवक कंत्राटी तत्वावर सैनिकांच्या स्वरुपात रशियाच्या सैन्यात सामील झाले आहेत. यातील काही जण नेपाळी सैन्यातून निवृत्त झालेले माजी सैनिक असल्याचे समजते. ही एक चिंताजनक स्थिती आहे. नेपाळ सरकारकडे हा प्रकार रोखण्याची कुठलीच शक्ती नसल्याचे उद्गार नेपाळमधील निवृत्त मेजर जनरल बिनोज बसन्यात यांनी काढले आहेत. गोरखा युवक रशियाच्या सैन्यात सामील होत असल्याने भारतासमोर नवे संकट उभे राहणार आहे. नेपाळ अन् भारतातील संबंध अत्यंत ऐतिहासिक स्वरुपाचे आहेत. अशा स्थितीत नेपाळी नागरिकांनी युव्रेन युद्धात रशियाच्या वतीने भाग घेतल्यास नेपाळवर निर्बंध लादले जाऊ शकतात. नेपाळला निर्बंधांपासून वाचविण्यासाठी भारतालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.
भारतीय सैन्यातील भरती
रशियाच नागरिकत्व नेपाळी युवकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे. याचबरोबर भारतीय सैन्याने भरतीसंबंधी नियम बदलल्याने नेपाळी युवक आता रशियाच्या सैन्यात सामील होऊ लागले ओत. नेपाळ आणि भारत यांच्या संबंधात मागील वर्षी तणाव निर्माण झाला होता. तेव्हा भारत सरकारने सैन्यातील सेवेचे स्वरुप अग्निवीर योजनेच्या अंतर्गत बदलले होते. यानंतर नेपाळने 200 वर्षे जुनी भरती प्रक्रिया रोखली होती. अग्निवीर संबंधी अधिक स्पष्ट स्थिती निर्माण होत नाही तोवर गोरखा भरती प्रक्रियेत सामील होणार नसल्याचे नेपाळने म्हटले होते.
अनेक व्हिडिओ समोर
सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात नेपाळी गोरखांना रशियात सैन्य प्रशिक्षण घेताना पाहिले जाऊ शकते. नेपाळ सैन्यातून निवृत्त एका गोरखा सैनिकाने यासंबंधी खुलासा केला आहे. हा माजी सैनिक दुबईत एक सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता, त्याला अधिक आकर्षक प्रस्तावांचे आमिष दाखवत रशियात नेण्यात आले होते. या नेपाळी नागरिकाने एका पर्यटकाच्या स्वरुपात मॉस्कोचा प्रवास केला होता, त्यानंतर तो रशियाच्या सैन्यात दाखल झाला होता. रशियाने आता विदेशी नागरिकांच्या भरतीसाठी रशियन भाषा अवगत असण्याचा नियमही संपुष्टात आणला आहे. युक्रेन युद्धादरम्यान रशियाने वॅगनरच्या सदस्यांना अनेक प्रकारचे लाभ देण्यास सुरुवात केली आहे.









