सार्वजनिक कार्यक्रमामध्ये नायट्रोजन फुग्यांचा स्फोट झाल्याने गंभीर जखमी, महापौरांनाही फटका
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री बिष्णू पौडेल आणि पोखरा महानगराचे महापौर धनराज आचार्य हे शनिवारी एका भयावह दुर्घटनेतून बालबाल बचावले. ते उपस्थित असलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात नायट्रोजनने भरलेल्या फुग्यांचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत ते होरपळले आहेत. उपपंतप्रधान पौडेल यांचे डोके आणि चेहरा आगीमुळे भाजला आहे. उपपंतप्रधान पौडेल यांच्यासोबतच महापौरही जखमी झाले असून दोघांनाही विशेष हेलिकॉप्टरने काठमांडूला हलविण्यात आले आहे. दोघांनाही उपचारासाठी कीर्तीपूर बर्न हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
पोखरा पर्यटन वर्षाच्या उद्घाटन समारंभाला दोन्ही नेते उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी आकाशात सोडण्यासाठी ठेवलेले फुगे फायर पॉपर्सच्या संपर्कात आल्यामुळे फुटले. हे फुगे हायड्रोजन वायूने भरलेले होते. त्यांना आग लागताच मोठा स्फोट झाला. याप्रसंगी हे दोन्ही नेते त्याच्या शेजारीच उपस्थित असल्यामुळे आगीचा झोत त्यांच्यापर्यंत पोहोचला. कास्की जिल्हा पोलिस अधीक्षक श्यामनाथ औलिया यांनी या घटनेची पुष्टी केली. दोन्ही नेत्यांना पुढील उपचारांसाठी काठमांडूला नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमस्थळी अराजकतेची स्थिती
कार्यक्रमादरम्यान फुग्यांना आग लागताच ती वेगाने आजुबाजुला पसरली. उपपंतप्रधान आणि महापौर जवळच उपस्थित होते आणि त्यामुळे दोघेही त्यात अडकले. याचदरम्यान घटनेच्या वेळी कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाला. लोकांनी धावपळ सुरू केल्याने काही वेळ अराजकत पसरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. घटनेनंतर कार्यक्रम मध्यभागी थांबवण्यात आला.









