ओडिशाच्या कलिंगा विद्यापीठातील घटना : सहकारी विद्यार्थ्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये कलिंगा इन्स्टीट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीच्या (केआयआयटी) वसतिगृहात नेपाळी विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला असून याप्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. विद्यार्थिनीचा सहकारी भारतीय विद्यार्थ्यानंतर मंगळवारी केआयआयटीचे तीन संचालक आणि दोन सुरक्षारक्षकांना अटक करण्यात आली. या प्रकरणी तपासासाठी ओडिशा सरकारने मंगळवारी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, महिला आणि बाल विकास विभागाचे मुख्य सचिव आणि उच्च शिक्षण विभागाचे आयुक्त, सह-सचिव यांचा समावेश असलेले उच्चस्तरीय सत्यशोधन समिती स्थापन केली आहे.
16 फेब्रुवारी रोजी बी-टेकच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थिनी प्रकृति लामसालचा मृतदेह कॉलेजच्या वसतिगृहात आढळून आला होता. तिने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला होता. तर दुसरीकडे विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी कॉलेजमधील अन्य आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली आहेत. प्रकृतिच्या वर्गातील भारतीय विद्यार्थीच तिचा छळ करत होता असा आरोप करण्यात येत आहे. हा विद्यार्थी प्रकृतिचा बॉयफ्रेंड होता. तक्रारींनतर देखील विद्यापीठाने आरोपीच्या विरोधात कारवाई केली नव्हती. विद्यापीठाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप निदर्शक विद्यार्थ्यांनी केला आहे. परंतु मृत विद्यार्थिनीच्या चुलत बंधूच्या तक्रारीवर पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अहवालाच्या आधारावर कारवाई
केआयआयटीला नोटीस जारी करण्यात आली आहे. सरकारकडून स्थापन समितीच्या अहवालानुसार कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या विरोधात बळाचा वापर आणि गैरवर्तनाच्या आरोपाप्रकरणी चौकशी केली जात आहे. याप्रकरणी जबाबदार लोकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सरकारकडून म्हटले आहे.
तपास सुरू असल्याचे कळले
मुलीच्या मृत्यूप्रकरणी तपास केला जात असल्याचे मृत विद्यार्थिनीचे पिता सुनील लामसाल यांनी सांगितले आहे. उत्तरीय तपासणीचा अहवाल लवकरच समोर येईल. मुलीला त्रास देण्यात आला आणि भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करण्यात आले होते, याचमुळे तिने आत्महत्या केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. 17 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो. आमच्या मुलीचा चुलत बंधू देखील तेथेच शिकतोय. त्याने आम्हाला घटनेविषयी कळविले होते असे लामसाल यांनी सांगितले.









