50 सदस्यीय शिष्टमंडळही येणार : सीमेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा शक्य
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळचे पंतप्रधान पुष्पकुमार दहल उर्फ प्रचंड हे 31 मेपासून 3 जूनपर्यंत भारताच्या दौऱ्यावर असणार आहेत. मागील वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान झाल्यावर प्रचंड पहिल्यांदाच भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. प्रचंड यांच्यासोबत त्यांची कन्या गंगा देखील भारतात येणार आहे. तसेच प्रचंड यांच्या निकटवर्तीयांचा समावेश असलेले 50 जणांचे शिष्टमंडळ देखील दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत असणार आहे. दोन्ही देशांदम्यान सीमेशी निगडित मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचंड यांना भारत दौऱ्यासाठी निमंत्रित केले होते.
प्रचंड यांच्या या दौऱ्यादरम्यान काही महत्त्वाचे द्विपक्षीय करार देखील होऊ शकतात. भारत आणि नेपाळदरम्यान सीमेशी निगडित काही मुद्दे केपी ओली शर्मा हे नेपाळचे पंतप्रधान असताना उपस्थित करण्यात आले होते. या मुद्द्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने या दौऱ्यात पावले उचलली जाऊ शकतात.
दोन्ही देश इंटीग्रेटेड चेक पोस्ट्स स्थापन करण्यासंबंधी करार करू शकतात. दोन्ही देशांचे सीमा सुरक्षा दल एकत्रित गस्त तसेच तपासणी करू शकते. याचबरोबर पर्यटन आणि नागरी उ•ाण क्षेत्राकरता काही करार केले जाऊ शकतात.
नेपाळची डिजिटल पेमेंट सिस्टीम विकसित करण्यास भारताने मदत करावी अशी इच्छा तेथील सरकारची आहे. भारताने याकरता काही अटी ठेवल्या आहेत. नेपाळगंज हवाईमार्ग खुला करण्यावरही विचार केला जाऊ शकतो. नेपाळ आणि बांगलादेशदरम्यान भारतातून जाणारा व्यापारी मार्ग निर्माण केला जावा अशी भारताची इच्छा आहे. या प्रकरणी दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहे, परंतु अद्याप यातून कुठलाच निष्कर्ष निघालेला नाही. चीनच्या दबावापोटी नेपाळ याकरता होकार दर्शवित नसल्याचे मानले जात आहे.
पंतप्रधान मोदींना भेटणार
प्रचंड हे नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. याचबरोबर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनाही प्रचंड भेटणार आहेत. नेपाळ-भारत बिझनेस समिटला प्रचंड संबोधित करणार आहेत. डाव्या पक्षाचे नेते असणारे प्रचंड हे या दौऱ्यादम्यान उज्जैन आणि इंदोर शहराला भेट देणार आहेत. उज्जैनमध्ये प्रचंड हे महाकालाचे दर्शन घेतील. भारत आणि नेपाळ हे टेम्पल डिप्लोमसीद्वारे संबंध वृद्धींगत करू पाहत आहेत. मागील वर्षी नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान शेर बहादुर देउबा यांनी वाराणसी येथे जात विश्वेश्वराचे दर्शन घेतले होते. तर मे 2022 मध्ये स्वत:च्या नेपाळ दौऱ्यादरम्यान मेदींनी लुम्बिनी आणि मायादेवी मंदिरात दर्शन घेतले होते.