पात्रता फेरीच्या सामन्यात विजय मिळवत घडवला इतिहास
वृत्तसंस्था/ दुबई
नेपाळ क्रिकेट संघ टी 20 विश्वचषक 2024 स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. विशेष म्हणजे, नेपाळ संघ तब्बल 10 वर्षांनंतर टी 20 विश्वचषकात खेळताना दिसेल. यापूर्वी नेपाळ क्रिकेट संघाने 2014 मध्ये टी 20 विश्वचषकासाठी क्वालिफाय केले होते. मात्र, संघाला खास प्रदर्शन करता आले नव्हते. मात्र, आता संघाने 2024 च्या टी 20 विश्वचषकासाठी क्वालिफाय केले आहे. याशिवाय, ओमानने बहरिनला नमवत वर्ल्डकपसाठी पात्रता मिळवली आहे.
आगामी टी 20 वर्ल्डकप पुढील वर्षी जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. एकीकडे नेपाळने यूएईचा 8 गडी राखून पराभव केला, तर दुसरीकडे ओमानने बहरीनचा 10 गडी राखून पराभव करत टी-20 वर्ल्डकपसाठी पात्रता मिळवली.
नेपाळने उडवला युएईचा धुव्वा
पात्रता फेरीतील दुसरा सेमी फायनलचा सामना युएई आणि नेपाळ यांच्यात झाला. या सामन्यात युएईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमावून 134 धावा केल्या. अरविंदने 51 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 64 धावांची खेळी केली तर मोहम्मद वसीमने 26 धावांचे योगदान दिले. आसिफ खानने 13 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळने हे लक्ष्य दोन गडी गमावून पूर्ण केले. नेपाळकडून आसिफ शेखने 51 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 64 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय कर्णधार रोहित पौडेलने 20 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 34 धावा केल्या.
ओमानचा बहरीनवर दणकेबाज विजय
कीर्तिपूर येथील त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर पहिला सेमी फायनलच सामना खेळला गेला. या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ओमानने बहरीनचा 10 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बहरीनने 20 षटकांत 9 गडी गमावून 106 धावा केल्या. यष्टिरक्षक फलंदाज इम्रान अलीने 23 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 30 धावांचे योगदान दिले तर अहमर नसीरने 26 धावा केल्या. सर्फराज अलीने 23 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरातदाखल खेळताना ओमानने एकही विकेट न गमावता सामना जिंकला. ओमानकडून कश्यप प्रजापतीने 44 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 58 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली, तर प्रतिक आठवलेने 42 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. या विजयासह त्यांनी टी-20 वर्ल्डकपसाठी देखील पात्रता मिळवली.









