पाकिस्तानी दहशतवादी संघटना नेपाळमार्गे देशावर हल्ला करण्याची शक्यता केली व्यक्त
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
`श ए मोहम्मद आदी दहशतवादी संघटना भारतात नेपाळमार्गे घुसून हल्ला करण्याची शक्यता आहे, असा इशारा नेपाळच्याच एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिला आहे. या अधिकाऱ्याने भारताला सावध केले आहे.
नेपाळचे अध्यक्ष यांचे सल्लागार सुनिल बहादूर थापा यांनी हा इशारा दिला आहे. भारताने नेपाळशी लागून असलेल्या सीमेवर योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची आवश्यकता आहे. ‘सिंदूर’ कारवाईमुळे बिथरलेल्या दहशतवादी संघटना आता नेपाळ सीमेचा उपयोग भारतावर हल्ला करण्यासाठी करु शकतात. त्यामुळे भारताने संपूर्ण उत्तर सीमेवरच लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे, अशी सूचना काही संरक्षण तज्ञांनीही नेपाळी अधिकाऱ्याच्या सूचनेला अनुषंगून केली आहे.
सुरक्षा व्यवस्थेवर चर्चासत्र
नेपाळची राजघनी काठमांडू येथे आयोजित या चर्चासत्रात शुक्रवारी सुरक्षा या विषयावर बोलताना नेपाळचे अधिकारी थापा यांनी, तसेच या चर्चासत्रात भाग घेतलेल्या अनेक मान्यवरांनी या भागातील सुरक्षा बळकट करण्याच्या संदर्भात अनेक सूचना केल्या. नेपाळ इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड एन्गेजमेंट या संस्थेने या उच्चस्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले होते.
नेपाळवरही परिणाम
भारतात दहशतवादी हल्ले झाल्यास त्यांचे पडसाद नेपाळमध्येही उमटतात. यामुळे या संपूर्ण भागातली शांतता धोक्यात येते. पाकिस्तानचे प्रशासन दहशतवादाला पोसते. त्याचे भरण पोषण करते. त्यामुळे त्या देशात दहशतवादी संघटनांचा सुळसुळाट झाला आहे. याचा परिणाम सार्क संघटनेच्या प्रभावीपणावर आणि या संघटनेतील देशांच्या सुरक्षेवर होत आहे, असे मत या चर्चासत्रात अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे. या समस्येवर काही उपायही सुचविण्यात आले.
भारत-नेपाळ सीमा असुरक्षित
भारत आणि नेपाळ यांच्यात 1 हजार 751 किलोमीटर लांबीची सीमारेषा आहे. सीमारेषा ‘सच्छिद्र’ किंवा असुरक्षित आहे. नेपाळमधून सहजगत्या दहशतवादी भारतात प्रवेश करु शकतात. या सीमेवर गस्त किंवा सुरक्षा व्यवस्था कमी असल्याने एक परोक्ष मार्ग म्हणून (ट्रान्झिट रुट) म्हणून या लांबलचक सीमेचा उपयोग केला जाऊ शकतो. एकदा, या सीमेतून भारतात प्रवेश केल्यानंतर दहशतवादी भारतात कोठेही घुसखोरी करुन अशांतता माजवू शकतात. त्यामुळे ही सीमारेषा भारतासाठी त्रासदायक ठरेल, असा इशारा देण्यात आला आहे.
30 वर्षांपासून उपयोग
या असुरक्षित आणि सच्छिद्र सीमारेषेचा उपयोग लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांकडून 30 वर्षांपूर्वीपासूनच भारतात घुसखोरी करण्यासाठी होत आहे. अनेक कुप्रसिद्ध दहशतवाद्यांनी याच सीमेतून भारतात प्रवेश केला आहे. 1999 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण केले होते. हे विमान नेपाळची राजधानी काठमांडू येथून दिल्लीला येत होते. काठमांडू येथेच या विमानात पाकिस्तानी दहशतवादी घुसले होते. काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा व्यवस्था किती ढिसाळ आहे, याचे प्रत्यंतर त्यावेळी आले होते. आताही परिस्थिती विशेष सुधारलेली नाही. त्यामुळे भारताने पाकिस्तानला लागून असलेल्या सीमारेषेप्रमाणेच या सीमेवरही लक्ष दिले पाहिजे. नाहीतर भविष्यात भारतासाठी मोठा धोका येथूनच निर्माण होऊ शकतो अशी सूचना अनेक वक्त्यांनी केली.









