काही भागात आंदोलनाची धग कायम : कर्फ्यू वाढवला, 27 जणांना अटक
वृत्तसंस्था/ काठमांडू
सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नेपाळमध्ये सुरू झालेल्या निदर्शनांनी देशाचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलून टाकले आहे. हिंसक निदर्शने थांबवण्यासाठी मंगळवारी रात्री 10 वाजल्यापासून लष्कराने संपूर्ण देशाचा ताबा घेतला. त्यानंतरही अनेक भागात हिंसाचार सुरूच आहे. हिंसाचार प्रकरणात बुधवारी लष्कराने 27 जणांना अटक केली आहे. याचदरम्यान, येथील हिंसक निषेधात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 400 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. राजधानी काठमांडूसह देशभर जनरेशन झेडने चालवलेल्या सरकारविरोधी निदर्शनांनी देशात सत्तापालट घडवून आणला आहे.
नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाचा बुधवारी तिसरा दिवस होता. बुधवारी सकाळच्या सत्रात सामान्य परिस्थिती असताना दुपारनंतर काही ठिकाणी हिंसाचार पसरल्याची माहिती उपलब्ध झाली. तथापि, संपूर्ण परिस्थितीवर आता लष्कराची देखरेख असल्याने बहुतेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे. बुधवारी सीपीएन अध्यक्ष पुष्पा कमल दहल ‘प्रचंड’ यांची मुलगी गंगा दहल यांच्या जळालेल्या घरात एक मृतदेह सापडला. सध्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, असे ललितपूरचे एसएसपी श्याम कृष्ण अधिकारी यांनी सांगितले.
हजारो निदर्शकांनी संसदेपाठोपाठ मंगळवारी संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयाला आग लावल्यामुळे 25 हजारांहून अधिक खटल्यांच्या फायली आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दल देखील पाठवण्यात आले होते. जाळपोळ आणि लुटमारीच्या घटनांमध्ये नेपाळी लष्कराने अटकसत्र सुरू केले आहे. यासोबतच, कर्फ्यू देखील वाढवण्यात आला आहे. मंगळवारी रात्री 10 ते बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत देशभरात सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. लष्कराने सर्वांना शांतता राखण्याचे आणि गुन्हेगारांना पाठिंबा देऊ नये असे आवाहन केले आहे.
काठमांडूच्या गौशाला-चाबहिल-बुद्ध भागातून सुरक्षा दलांनी सुमारे 33.7 लाख नेपाळी रुपयांची चोरी केलेली रोकड जप्त केली आहे. याशिवाय, पोलिसांनी 31 बंदुका, मॅगझिन आणि दारूगोळा जप्त केला आहे. त्यापैकी 23 काठमांडू आणि आठ पोखरा येथून जप्त करण्यात आले आहेत. अलिकडच्या संघर्षात 23 पोलीस आणि 3 नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लष्कराने कर्फ्यू वाढवला, प्रतिबंधात्मक आदेश लागू
वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात कर्फ्यू आणि प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू होते. त्यानंतर आता पुन्हा गुरुवारी सकाळी 6 वाजल्यापासून कर्फ्यू सुरू होईल. त्यानंतर पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. काही अराजकतावादी घटक हिंसाचार, लूटमार, जाळपोळ आणि बलात्कार यासारखे गुन्हे करत असल्याचे लष्कराने म्हटले आहे.
काठमांडूला सर्वाधिक फटका
या संपूर्ण हिंसाचारात काठमांडूमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. हिल्टन हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले. राष्ट्रपती भवन शीतल निवासची तोडफोड करून आग लावण्यात आली. माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी चित्रकर त्यांच्या घरी लागलेल्या आगीत गंभीरपणे भाजल्या गेल्या आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कांतिपूर मीडिया ग्रुपच्या मुख्यालयालाही आग लावण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील आगीतही खटल्यांचे बरेच कागदपत्र भस्मसात झाले आहेत.
हिंसाचारामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी मंगळवारी राजीनामा दिला. त्यांना आता सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांचे आश्रयस्थान गुप्त ठेवण्यात आले आहे. 8 सप्टेंबर रोजी सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्याने निदर्शने सुरू झाली. निदर्शक भ्रष्टाचार संपवण्याची, सरकारमध्ये पारदर्शकता वाढवण्याची आणि जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी करत आहेत.
एअर इंडियाची उड्डाणे रद्द
हिंसाचारामुळे भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमेवर दक्षता घेतली जात आहे. उत्तर प्रदेशमधील सोनौली येथील सीमा बंद करण्यात आली आहे. एअर इंडियाने 10 सप्टेंबर रोजी काठमांडूला ये-जा करणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. काठमांडू विमानतळ बंद असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने माध्यमांना सांगितले. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि लवकरच अधिक माहिती शेअर करू, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दिल्ली-काठमांडू बससेवा बंद
नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे दिल्ली परिवहन महामंडळाने (डीटीसी) दिल्ली-काठमांडू बससेवा बंद केली आहे. आम्ही सध्या बससेवा बंद केली आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही ती पुन्हा सुरू करू, असे परिवहन अधिकाऱ्यांकडून बुधवारी सांगण्यात आले. तिकीट बुक केलेल्या प्रवाशांना पैसे परत केले जातील. दिल्ली-काठमांडू मैत्री बससेवा 1,167 किमी अंतराची असून तिचे भाडे 2,800 रुपये आहे.
सुशीला कार्की होणार अंतरिम पंतप्रधान?
नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान, आता नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांना अंतरिम पंतप्रधान करण्याची चर्चा सुरू आहे. आंदोलकांनी एक व्हर्च्युअल बैठक आयोजित करून घेतलेल्या जनमत चाचणीत कार्की यांना सर्वाधिक पाठिंबा मिळाला. या बैठकीत 5,000 हून अधिक तरुण ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. आतापर्यंत जनरेशन-झेडचे पोस्टर लीडर मानले जाणारे काठमांडूचे महापौर बालेन शाह यांनी मात्र सध्या याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र, सुशीला कार्की यांनी अंतरिम पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारण्यासही सहमती दर्शवल्याची माहिती प्रसारमाध्यम सूत्रांनी दिली. आता आता जनरेशन-झेडचे प्रतिनिधी लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिंग्देल यांना भेटून त्यांच्या पाठिंब्याने अंतरिम सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करतील. लष्करप्रमुखांनी सहमती दर्शविली तर कार्की देशाचे नेतृत्व स्वीकारतील.
सुशीला कार्की यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून (बीएचयू) राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी 1979 मध्ये वकिली क्षेत्रात कारकीर्द सुरू केली. 11 जुलै 2016 ते 6 जून 2017 पर्यंत त्या नेपाळच्या सरन्यायाधीश होत्या. 2017 मध्ये त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला. सुशीला कार्की यांच्यावर पक्षपात आणि कार्यकारी यंत्रणेत हस्तक्षेप केल्याचा आरोप होता.









