शेजाऱ्याच्या रागातून दुचाकीला आग
कराड : शेजाऱ्याशी किरकोळ वाद झाल्यानंतर त्याच वादाच्या रागातून शेजाऱ्याची स्प्लेंडर प्लस दुचाकी एकाने पेटवून दिल्याची घटना मुंढे (ता. कराड) येथे घडली. या प्रकरणी दिनेश शंकर बाघमारे (वय ३३, रा. गुंढे, ता. कराड) यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली असून आगीत दुचाकीसह आरसीबुक, वाहन परवाना जळून खाक झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश वाघमारे गवंडीकाम करून उपजीविका चालवतात. २७ रोजी रात्री सुमारास ९ वाजता त्यांनी दुचाकी चुलते तुकाराम बाघमारे यांच्या घरासमोर उभी केली होती. पहाटे दोन वाजता मोठा स्फोटाचा आवाज आल्याने बहिनी पूनम बाघमारे जागी झाली. बाहेर पाहिले असता दुचाकीला आग लागलेली दिसली. घटनेची माहिती मिळताच दिनेश वाघमारे घटनास्थळी धावले असता गाडी पूर्णपणे जळत असल्याचे दिसून आले.
यावेळी परिसरात लोकांची गर्दी जमली होती. त्यातील एकाने सांगितले की, आपले शेजारी विशाल संजय बाघमारे गाडी पेटवून पळत जाताना दिसला. यापूर्वी रात्री दिनेश आणि विशाल यांच्यात वाद झाला होता. विशाल रात्री उशिरा गावात फिरू नये, असे सांगितल्यावर त्याने रागाने तुला मी बघून घेईन असे म्हणून शिवीगाळ केली होती.
त्याच वादाच्या रागातून विशाल बाघमारे याने हे कृत्य केल्याचा संशय आहे. घटनेनंतर दिनेश बाघमारे यांनी विशालला विचारले असता, त्यानेच गाडी पेटवली असल्याची कबुली दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात विशाल संजय बाघमारे याच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.








