वांगी प्रतिनिधी
येथील स्वातंत्र्यसेनानी शंकरराव निकम यांच्या कुटुंबियांना घराच्या दरवाजास उच्च दाब वाहिनीचा करंट जोडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सख्खा शेजारी गजानन शामराव वडर (३७ रा. वांगी) याला चिंचणी-वांगी पोलिसांनी अटक केली आहे.
वडार कुटुंबाची 22 एकर जमीन सावत्र भाऊ शशिकांत वडर याच्या नावावर होण्यासाठी निकम कुटुंबाने मदत केली असावी अशा संशयावरून त्याने निकम कुटुंबियांना संपवण्याचा घाट घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे असे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी सांगितले.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुरज अशोकराव निकम ( ३६, रा.वांगी ता. कडेगाव जि.सांगली) यांनी पोलिसात तक्रार दिली होती. दि. ४ आक्टोबर रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास गजानन शामराव वडार याने निकम कुटुंबीय झोपी गेल्यानंतर रात्री घराजवळी लाईटच्या डि. पी. मध्ये असलेल्या विजेच्या प्रवाहाला निकम यांच्या घराच्या मागच्या आणि पुढच्या दरवाजांना जोडले होते. अचानक दुरून तारा खेचल्याने डीपी मध्ये जाळ झाला आणि वीज गेली .आवाजामुळे निकम यांच्या वडीलांनी घराचा पुढील दरवाजा उघडला त्यावेळी दरवाजाच्या कडी कोयंड्यास वायर खोलून त्यांची तार अडकविण्यात आलेली आढळली. त्याचप्रमाणे घराच्या मागील दरवाजाच्या कडी कोयंड्यासही वायर खोलून त्यांची तार अडकविण्यात आलेली होती, सदरची वायर ही घराशेजारीच असणारे डिपीला आकडा टाकून आणलेली होती, ज्यामुळे निकम कुटूंबातील लोकांना विजेचा शॉक लागून सर्वजण ठार होतील. या उद्देशाने सदरची वायर अडकविण्यात आलेली होती. याबाबत निकम यांनी तक्रार दिलेली होती. सदर गुन्हयांचा तपासा दरम्यान शेजारी शशिकांत वडार व त्याचा सावत्र भाऊ गजानन वडार यांच्यात वडीलार्जित जमिनीचा वाद होता. सदरचा वादाचा निकाल हा शशिकांत वडार यांच्या बाजूने लागला होता. त्यामध्ये सुरज निकम यांनी शशिकांत वडार याला मदत केलेच्या संशयावरुन गजानन वडार याने हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.याबाबत पोलिसांनी गोपनीयरित्या अधिक तपास केला असता सदरचा प्रकार हा संशयित गजानन शामराव वडार याने केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यास अटक करण्यात आली आहे.








