250 टन कचरा उत्पादन होऊनही पुरवठा करण्याकडे मनपाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात 250 टन कचऱ्याची उत्पत्ती दररोज होऊनदेखील नेहरुनगर येथील बायोगॅस उत्पादन प्रकल्पाला कचऱ्याची चणचण भासत आहे. केवळ इंदिरा कॅन्टीनच्या कचऱ्यावर बायोगॅस उत्पादन सुरू असून दररोज 1 सिलिंडर इतक्याच गॅसचे उत्पादन होत आहे. कचरा पुरवठा करण्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हा प्रकल्प बंद पडण्याची शक्यता आहे.
नेहरुनगर येथील इंदिरा कॅन्टीनशेजारील जागेत महापालिकेच्यावतीने बायोगॅस प्रकल्प उभारला आहे. दररोज 500 किलो कचऱ्याद्वारे गॅसनिर्मिती करण्याची क्षमता आहे. या माध्यमातून दररोज 3 ते 4 सिलिंडर गॅस निर्मिती होऊ शकते. पण सध्या इंदिरा कॅन्टीनमध्ये जमा होणारा कचरा यामध्ये घातला जात आहे. याद्वारे केवळ एक सिलिंडर इतकेच गॅस उत्पादन होत आहे. महापालिकेकडे जमा होणारा ओला कचरा या प्रकल्पाला पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शहरात दररोज 250 टन कचरा निर्माण होऊनदेखील केवळ 500 किलो कचरा या प्रकल्पाला पुरवठा करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. एकीकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठमोठे प्रकल्प राबवून निधी खर्च केला जात आहे. तर दुसरीकडे सुरू झालेल्या प्रकल्पाला कचरा पुरवठा करण्याकडे मनपाचे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास येत आहे. शहरातील सर्व कचरा तुरमुरी कचराडेपो येथे टाकला जातो. त्याठिकाणी प्रक्रिया करून खत उत्पादन केले जाते. पण त्याकरिता प्रक्रिया खर्च महापालिकेला द्यावा लागतो. कचरा विघटनाच्या खर्चाचा बोजा महापालिकेवर वाढत असल्याने स्थानिक पातळीवर कचऱ्याचे विघटन करून कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची सूचना नगर विकास खात्याने महापालिकेला केली आहे. त्यामुळे 4 ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. यापैकी नेहरुनगर, एपीएमसी मार्केट व उद्यमबाग अशा ठिकाणी प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले होते.
दररोज 3 ते 4 सिलिंडर गॅस उत्पादन शक्य
सध्या इंदिरा कॅन्टीनचा कचरा या प्रकल्पासाठी वापरला जातो. पण महापालिकेकडे जमा होणारा कचरा पुरवठा केला जात नाही. या प्रकल्पाला कचरा पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष करण्यामागचे गौडबंगाल काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. कचरा पुरवठा करून प्रकल्प सुरू न ठेवल्यास याकरिता खर्च करण्यात आलेला निधी वाया जाण्याची शक्यता आहे. महापालिकेने कचरा पुरवठा केल्यास दररोज 3 ते 4 सिलिंडर गॅस उत्पादन होऊ शकते. इंदिरा कॅन्टीनला दररोज 3 सिलिंडरची आवश्यकता आहे. पण बायोगॅसच्या माध्यमातून केवळ 1 सिलिंडर गॅसपुरवठा होत आहे. महापालिकेने प्रकल्पाला कचरा पुरवठा केल्यास इंदिरा कॅन्टीनला गॅसपुरवठा करणे शक्य आहे.









