प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटकातील हावेरी मतदारसंघातील भाजप आमदार नेहरू सी. ओलेकार यांना बनावट बिलप्रकरणी दोन वर्षांच्या तुरुगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, त्यांना आमदारपदावरून अपात्र ठरविण्यात आले आहे. याप्रकरणी हायकोर्टाच्या आदेशामुळे आमदार अटकेच्या धोक्यातून बचावले आहेत.
बेंगळूरच्या लोकप्रतिनिधींच्या न्यायालयाने आमदार नेहरू सी. ओलेकर यांना 13 फेब्रुवारी 2023 रोजी दोन वर्षांचा साधा कारावास आणि दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने या निकालाला स्थगिती देऊन जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, न्यायालयाने आमदार दोषी असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना आमदारपदावरून अपात्र ठरविले आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना सत्ताधारी भाजपच्या आमदाराला अपात्र ठरविल्याने पक्षासमोर पेच निर्माण झाला आहे.
प्रकरण काय आहे?
हावेरीचे भाजप आमदार नेहरू सी. ओलेकार 2008 ते 2013 या काळात आमदार असतानाहावेरी महापालिकेच्या कामांचे कंत्राट आपल्या मुलांना दिले होते. परंतु 5 कामे झाली नसतानाही एकूण 5.35 कोटी रुपयांची कामे झाल्याचे सांगून बनावट बिल तयार करून फसवणूक केली होती.









