लोकसभा निवडणुकीची रणवाद्ये वाजायला सुरुवात झाली आहे. आता कळीचा मुद्दा म्हणजे जागा वाटप, उमेदवारी आणि प्रचाराचे मुद्दे अर्थात त्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी व इंडिया आघाडी यांचे गृहपाठ सुरु झाले आहेत. महाराष्ट्रात दुष्काळ आणि मराठा आरक्षण हे मुद्दे तर आहेतच पण जोडीला भाजपाची मेगाभरती होणार हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. संसदेचे विशेष अधिवेशन कोणता पवित्रा घेते हे बघावे लागेल. तूर्त ज्येष्ठ मंडळी जागा वाटपात आपल्या पक्षाला मोठा वाटा मिळावा म्हणून रणनीती आखताना दिसत आहेत. जागा वाटप आणि रणनीती या संदर्भाने शरद पवार यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. त्यांना या गोष्टीचा दांडगा अनुभव आणि कुणाला कात्रजचा घाट दाखवायचा यांची गणिते पाठ आहेत. शरद पवारांनी गेले दोन दिवस राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षात अंतर्गत झालेली फूट आणि शक्तीपात लक्षात घेता मविआत काँग्रेस पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार हे वेगळे सांगायला नको. तथापि आमदार, खासदार म्हणजे पक्ष नव्हे. विचार म्हणजे पक्ष असे म्हणत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगेस नवे चेहरे घेऊन मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत वगैरे नेत्यांनी शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी प्राथमिक बोलणी केली आहेत. पण काँग्रेसतर्फे या बैठकीला कुणी नव्हते. आता जागा वाटपाचे खरे धोरण, मागण्या, पवित्रे हे बुधवारी दिल्लीत होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत स्पष्ट होतील. जिंकणारा उमेदवार हे सूत्र असेलच, पण आघाडीतील 24-25 घटक पक्षांना सामावून घेताना नेत्यांची दमछाक होणार हे स्पष्ट आहे. कुणी कितीही म्हंटले तरी काँग्रेस पक्ष हाच आज प्रमुख विरोधी पक्ष आहे हे मान्य करावे लागेल. काँग्रेसची उत्तर प्रदेश, बंगाल, दिल्ली, पंजाब, कर्नाटक येथे कोंडी करण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न राहिल हे स्पष्ट आहे. प्राथमिक बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाईल आणि मग उमेदवार निवडले जातील. पण नेत्यांनी केलेले जागा वाटप आणि तिकीट वाटप कार्यकर्ते मान्य करतील असे नाही. अनेक ठिकाणी बंडाची निषाणे उंचावली जातील. तर काही ठिकाणी वरुन कीर्तन आतून तमाशा असे खेळ खेळले जातील. उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला जागा मिळाव्यात यासाठी काँग्रेस तर आग्रही आहेच पण राष्ट्रीय लोकदल, समाजवादी पक्ष यांचीही टोकाची भूमिका असणार आहे. शिवसेनाही अयोध्येतून जागा मागू शकते. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या निवडणुकीत तुलनेने समाजवादी पक्षाची कामगिरी बरी होती. काँग्रेस खूपच पिछाडीवर पडली पण राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेला आणि प्यार की दुकान मुळे काँग्रेसला मोठा आत्मविश्वास आला आहे. कर्नाटकात एकहाती सत्ता आल्याने काँग्रेस सर्वच ठिकाणी जागा वाटपात मोठी मागणी करु शकते. तथापि उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बंगाल पाठोपाठ बिहारच्या जागावाटपातही अडचणी आहेत. तेथे राजद आणि जेडीयू हे प्रबळ पक्ष आहेत. जेडीयूचे विद्यमान लोकसभेत सतरा खासदार आहेत. मुंबईच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत लालू प्रसाद यादव आणि ममता बॅनर्जी यांची विधाने व इंडिया आघाडीच्या बैठकीत ममता दीदींना व्यासपीठावर खुर्ची नसणे यामुळेही नाराजी आहे. लालू प्रसाद थकले आहेत पण ते बिहारमध्ये आपले पत्ते खेळू शकतात. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची मोठी भूमिका आहे. त्यांना इंडिया आघाडीचे नेतृत्व हवे आहे. पण बंगालमध्ये डावे पक्ष, काँग्रेस यांच्याशी त्यांचा सामना आहे. बंगालच्या निवडणुका हिंसाचाराच्या वाटेने जातात. हे आजवर अनेकवेळा दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर आप पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. आपने दिल्ली, पंजाब, गोवा येथे आपले हातपाय पसरायचा इरादा पूर्वीच स्पष्ट केला आहे. इंडिया आघाडीत अनेक लहान-मोठे घटक पक्ष आहेत. त्यांच्याही एक जागा, दोन जागा असे दावे आहेत. राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना एक जागेवर समाधान मानणार असली तरी त्यांचा दोन ते तीन जागेसाठी आग्रह राहू शकतो. शरद पवार यांच्या निवासस्थानी दिल्लीत दोन दिवस होणाऱ्या चर्चेत अनेक पक्ष व नेत्यांची पाने उघड होतील.त्यानंतरच लोकसभेच्या निवडणुकीचा डाव मांडला जाईल. सत्तारुढ एन.डी.ए मध्येही सगळे ऑलवेल नाही. भाजपाने मोठी तयारी केली आहे. यावेळी महाराष्ट्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ राहिली नाही यांचाही एनडीएला फायदा होऊ शकतो. तथापि दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, राजकारणाचा चिखल हे मुद्दे आहेत. सरकारला महिन्याभराची मुदत देऊन मनोज जरांगे काही अटीवर आपले उपोषण मागे घेणार आहेत. तथापि वाढती जनसंख्या, बेरोजगारी, कंत्राटी भरती कायदेशीर अडचणी आरक्षणावरुन जाती जातीत निर्माण होत असलेले तेढ या सर्वांचे परिणाम येत्या निवडणुकीत दिसतील हे वेगळे सांगायला नको. भाजपाने इंडिया आघाडी म्हणजे घराणेशाहीचे पक्ष व त्यांचे कुटुंबाच्या हितासाठीचे एकत्रिकरण या मुद्द्यावर भर देत इंडिया आघाडीला टार्गेट केले आहे. भाजपाने राष्ट्रवाद आणि भारताला जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न दाखवले आहे. चांद्रयान व आदित्ययान याचे यश व मोदींची जागतिक प्रतिमा याचाही एनडीए लाभ उचलण्याच्या तयारीत आहे. तथापि मोठ्या संख्येने बेरोजगारी, दुष्काळ आणि शेतकऱ्यांची दुरावस्था याचे फटके या आघाडीस बसू शकतात. इंडिया आघाडीत जे घटक पक्ष आहेत ते प्रादेशिक स्वरुपाचे आणि एका कुटुंबाच्या वर्चस्वाचे आहेत. काँग्रेस व आप थोडा विस्तारलेला पक्ष आहे. त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला काय ठरतो. एकूणच जागात काँग्रेसच्या वाट्याला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात का? हे बघावे लागेल. पण दिल्लीत संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या बरोबरीने जागा वाटप त्यासाठी फॉर्म्युला यावर चर्चेची गुऱ्हाळे होणार आहेत. या गुऱ्हाळातून नेमके बाहेर काय येते, कोणता फॉर्म्यूला निश्चित होतो आणि तो सर्वमान्य होतो का? यावर बरेच अवलंबून आहे. पुढे पक्ष पंधरवडा आहे. सगळीकडे हा काळ मंदीचा असतो. राजकीय आखाड्यातही मंदीच राहिल. तूर्त जागा वाटपावरुन इंडिया आघाडीचे पत्ते हळूहळू ओपन होतील.
Previous Articleचंद्राबाबू नायडू न्यायालयीन कोठडी, समर्थकांकडून निदर्शने
Next Article ‘मिशन रानीगंज’ 6 ऑक्टोबरला झळकणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








