बोटावर मोजण्याइतकेच नगरसेवक उपस्थित : म्हैसूर दौरा रद्दमुळे नाराजी?
प्रतिनिधी / बेळगाव
नगरसेवकांना कशा प्रकारे समस्या सोडविता येतात, सर्वसामान्य जनतेची कामे कशी करावीत, कोणकोणता निधी महापालिकेला येतो, तो निधी कशा प्रकारे खर्च केला जातो, याबाबत म्हैसूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नगरसेवकांसाठी कार्यशाळेचे महापालिकेच्या सभागृहात आयोजन केले होते. मात्र केवळ बोटावर मोजण्याइतकेच नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे ही कार्यशाळा कुचकामी ठरली आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यामुळे आम्हाला या कार्यशाळेमधून काहीच समजणे अवघड झाले आहे. अशा प्रतिक्रिया नगरसेवकांनी दिल्या. सभागृहामध्ये डिजिटल स्क्रीन लावण्यात आली होती. त्याद्वारे नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात येत होते. मात्र याबाबत कोणीच गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले. कार्यशाळा म्हणजे केवळ वेळ वाया घालविण्याचा प्रकार ठरला आहे. कार्यशाळेसाठी आलेले नगरसेवक महापौरांच्या कक्षामध्ये जाऊन बसले होते. याचबरोबर इतर नगरसेवक विविध विषयांवर चर्चा करत बसल्याचे दिसून आले. वास्तविक नगरसेवकांना या कार्यशाळेसाठी म्हैसूरला नेण्याचे आयोजन होते. मात्र काही कारणास्तव ते रद्द झाले. यामुळे नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.









