महापालिकेने कानाडोळा केल्याने नागरिकांच्या तक्रारीत वाढ
बेळगाव: शहरातील स्वच्छतेबाबत तक्रारी वाढल्या आहेत. महापालिकेने नाला सफाई मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे. मात्र नालाकाठावर साचलेला कचरा हटविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. नाल्याच्या काठावर असलेला कचरा पावसामुळे पुन्हा नाल्यामध्ये वाहून जातो. याची माहिती असूनदेखील महापालिकेने याकडे कानाडोळा केल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. पावसाळ्यात नाल्यामध्ये कचरा अडकून नालाकाठावरील घरांमध्ये पाणी शिरते. या समस्या उद्भवण्यास महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. नाला स्वच्छता मोहीम राबविताना नाल्यातील कचरा व्यवस्थित काढला जात नाही. काहीवेळा नाल्यातील कचरा काढून नालाकाठावर ठेवला जातो. मात्र ठेवलेल्या कचऱ्याची उचल केली जात नाही. त्याठिकाणी पडून पुन्हा तो नाल्यामध्ये कोसळतो. पावसामुळे काठावरील कचरा वाहून नाल्यात मिसळतो. दरवर्षीचेच रडगाणे असून महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार घडत आहेत. शास्त्रीनगर परिसरातील नाल्याची स्वच्छता करण्यात येत आहे. पण काही ठिकाणी साचलेल्या कचऱ्याची उचल करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नाल्यावर कचऱ्याचा ढिगारा साचला असून, दुर्गंधी पसरली आहे. कचऱ्याची उचल करण्याची मागणी नागरिकांनी केली असता त्याची दखल घेण्यात आली नाही. सदर कचऱ्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली असून, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कचऱ्याची उचल करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. सध्या महापालिका प्रशासनाचे अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. वळीव पावसाला सुरुवात झाल्यास नाल्यातील कचरा काढणे अवघड बनू शकते. त्यामुळे आतापासूनच नाला स्वच्छता मोहीम सर्वत्र राबविणे गरजचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.









