सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष घालण्याची मागणी
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
येथील मराठी प्राथमिक शाळेच्या जुन्या जीर्ण झालेल्या दोन शाळा खोल्यांची इमारत कोसळून दोन वर्षे झाली. तरीही सार्वजनिक शिक्षण खाते व लोकप्रतिनिधीनी नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी शासकीय निधी मंजूर करून देण्यास विलंब करत असल्यामुळे विद्यार्थीवर्गाची कुचंबणा होत आहे. तसेच शाळेच्या उत्तर दिशेकडून वर्गखोल्या कोसळल्यामुळे व शाळेला संरक्षक भिंत नसल्यामुळे समाजकंटक शाळेमध्ये येवून अवैध धंदे करणे तसेच शाळेची नासधुस करण्याच्या प्रकारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देवून कोसळलेल्या शाळा खोल्या बांधून संरक्षक भिंत बांधून शाळेची पवित्रता अबाधित ठेवण्याची मागणी पालकवर्ग व शिक्षणप्रेमींतून करण्यात येत आहे.
सदर शाळाखोल्या कोसळून जवळजवळ दोन वर्षे होत आली. मुसळधार पावसामुळे रात्रीच्यावेळी शाळा खोल्या कोसळल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका झाला तर दिवसा शाळा सुरू असताना शाळाखोल्या कोसळल्या असत्या तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु गावचे जागृत देवस्थान श्री कलमेश्वर मंदिर शेजारी असलेल्या या पवित्र मंदिरातील विद्यार्थ्यांना कलमेश्वर देवस्थानच्या कृपेमुळे अभय मिळाल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त करण्यात आल्या. शाळा सुधारणा कमिटी, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी शाळेच्या नूतन खोल्या बांधकामासाठी अनेकवेळा अर्जविनंत्या करण्यात आल्या. परंतु परिस्थिती जैसे थे असल्यामुळे मुलांचे भवितव्य घडविणाऱ्या शाळेसाठी रस्त्यावर उतरावे लागेल, अशाही प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होताना दिसत आहेत.
अवैध धंद्यांना ऊत
शाळा हे ज्ञानमंदिर आहे. आई-वडील आपल्या मुलांना सुसंस्कारीत करतात. परंतु सहा वर्षांनंतर त्यांच्या भावी शैक्षणिक जीवनात त्यांना घडविण्याचे काम या ज्ञानमंदिरात होत असते. अशा ज्ञानमंदिराच्या गेटचे कुलूप तोडून शाळेच्या नासधुसीबरोबर अवैध धंदे करणे ही निंदनीय घटना काही समाजकंटकांकडून घडत आहे. परंतु या ज्ञान मंदिरातून आपली मुले शिकून भावी शैक्षणिक जीवनात पुढे जाणार आहेत. याचे भान समाजकंटकांना असणे गरजेचे आहे. यापुढे तरी असे घडू नये व श्री कलमेश्वर देवस्थान अशांना सुबुद्धी देवो, अशीही धार्मिक भावना व्यक्त होत आहे. तेंव्हा सार्वजनिक शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी त्वरीत लक्ष देवून शाळा खोल्या व संरक्षक भिंत बांधून देण्याची मागणी होत आहे.









