प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय : आमदार विठ्ठल हलगेकर यांनी लक्ष घालणे गरजेचे
खानापूर : येथील जुन्या बसस्थानकापर्यंत बस सोडण्यात याव्यात, या मागणीसाठी ऑक्टोबर महिन्यात शिवस्मारकात जाहीर बैठक घेऊन कमिटी स्थापण केली होती. या कमिटीच्या माध्यमातून जुन्या बसस्थानकापर्यंत बस सोडण्यासाठी पालकमंत्र्यांसह इतर अधिकाऱ्यांना भेटून प्रयत्न करण्याचे ठरले होते. मात्र या बैठकीला तीन महिने उलटले तरी कोणतेही प्रयत्न केले गेले नसल्याने तसेच सर्व बसेस खानापूर येथील नव्या स्थानकातच थांबत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. याकडे आमदार विठ्ठल हलगेकर तसेच बस जुन्या बसस्थानकापर्यंत सोडण्यासाठी ज्यांनी आग्रहाची भूमिका घेतली होती. याबाबत सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खानापूर येथील जुन्या बसस्थानकातून गेल्या 24 वर्षापासून बस सोडण्यात येत आहेत. मात्र गेल्या चार महिन्यापासून बस जुन्या बसस्थानकापर्यंत आणण्याचे आणि सोडण्याचे बंद केले आहे. आता तर सर्वच बसेस नव्या बस स्थानकातूनच सोडण्यात येत आहेत. तसेच बेळगावहून परत येणाऱ्या बसेसही नव्या बसस्थानकातच थांबत आहेत. त्यामुळे वृद्ध नागरिकांना, रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवस्मारक येथील जुन्या बसस्थानकापर्यंत बस सोडण्यात याव्यात, या मागणीसाठी आंदोलन झाले हेते. त्यानंतर शिवस्मारक येथे ऑक्टोबर महिन्यात बैठक घेऊन याबाबत एक कमिटी स्थापन केली होती. या कमिटीच्या माध्यमातून पालकमंत्री व इतर अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्याचे ठरविले होते. त्यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी पुढाकार घेऊन पुन्हा बस जुन्या बसस्थानकापर्यंत सोडण्यात याव्यात, अशी सूचना आगार प्रमुखांना केली होती. परंतु त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करण्यात आले आहे.
नव्या बस स्थानकातच प्रवाशांना उतरण्यास भाग
आमदार विठ्ठल हलगेकर यांनी जुन्या बसस्थानक परिसराची पाहणी करून पोलीस स्थानक रस्त्याच्या बाजूला भराव टाकून बसेस वळविण्यासाठी जागा करण्याचे नियोजनही केले होते. मात्र यानंतर याबाबत कोणताच पाठपुरावा झालेला नाही. त्यानंतर सर्वच बसेस नव्या स्थानकातून बेळगावकडे सोडण्यात येत आहेत. तसेच बेळगावहून येणाऱ्या बसेस नव्या बस स्थानकातच प्रवाशांना उतरण्यास भाग पाडत असल्याने सर्व प्रवाशाना नव्या बसस्थानकात उतरुन खानापुरात यावे लागत आहे. त्यामुळे सर्वानाच नाहक त्रास होत आहे.
आगारप्रमुखांच्या हेकेखोरपणामुळे प्रवाशांची गैरसोय
रात्री उशीरा येणाऱ्या बसेस बायपास रस्त्यावरुन जात आहेत. त्यामुळे रात्री, अपरात्री येणाऱ्या प्रवाशांना तीन कि. मी. बाहेर उतरण्यास भाग पाडत आहेत. तसेच हल्याळ, गोवा, शिर्शी, यल्लापूर या ठिकाणी जाणाऱ्या बसेस खानापूर बस स्थानकातून थेट पारिश्वाड क्रॉसवरुन बायपास रस्त्याने जात आहेत. त्यामुळे दिवसाही या बसेस जुन्या स्थानकापर्यंत येत नसल्याने यल्लापूर, हल्याळ, कारवार या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. बस आगारप्रमुखांचा हेकेखोरपणामुळे जुन्या बसस्थानकाचे अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी ठोस भूमिका घ्यावी आणि आगाप्रमुखांना सर्व बसेस जुन्या स्थानकापर्यंत आणण्याची सूचना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









