वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
गावाजवळील तलावाचे सौंदर्यीकरण करतेवेळी तलावाच्या पूर्व दिशेला बांधण्यात आलेल्या गणपती विसर्जन कुंडाची एका बाजुची भिंत कोसळून वर्ष झाले. परंतु शासनाने पडलेली भिंत बांधून गणपती विसर्जन कुंडाची निर्मिती करण्यात अपयश आल्यामुळे यावर्षी कंग्राळी बुद्रुकवासियांना आपल्या घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन कुठे करायचे? याची चिंता लागली असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे. पडलेल्या भिंतीची पुनर्बांधणी करण्याचे काम शासनाचे की कंत्राटदाराचे? अशा संमिश्र प्रतिक्रियाही व्यक्त होताना दिसत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निधीतून गावाजवळील तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी 1 कोटी 20 लाख रुपये मंजूर झाले होते. यामध्ये तलावाचे संपूर्ण सौंदर्यीकरण धोबीघाट, जनावरांसाठी जनावरे धुणे, पाणी पाजणे तसेच गणपती विसर्जन कुंडाची निर्मिती करण्यात आली होती. एक दोन वर्षे भाविकांनी या विसर्जन कुंडामध्ये गणेशमूर्ती विसर्जन केल्या. परंतु कंत्राटदाराच्या निकृष्ठ कामामुळे मागीलवर्षी सदर कुंडाची तलावाच्या दक्षिणेकडील भिंत कोसळली आणि शासनाचा लाखो रुपयांचा पैसा पाण्यात गेला. यानंतर मागील वर्षी तरी उन्हाळ्यामध्ये सदर भिंतीची पुनर्बांधणी करून गणपती विसर्जन कुंडाचे सौंदर्य जैसे थे ठेवण्याची गरज होती. परंतु याकडे कुणाचे लक्ष न दिसल्यामुळे यावर्षी अनंतचतुदर्शीला गणपती मुर्तींचे विसर्जन कुठे करायचे, ही चिंता कंग्राळी बुद्रुकवासियांना भेडसावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.









