गळती लागून साचले पाणी : तहसीलदारांचे दुर्लक्ष, इमारतीची दुर्दशा, संबंधित अधिकारी लक्ष देणार का?
प्रतिनिधी / बेळगाव
एकेकाळी शहराचे वैभव असणाऱ्या व अनेक घटनांच्या साक्षीदार असणाऱ्या रिसालदार गल्लीतील महानगरपालिकेच्या जीर्ण इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सध्या त्यामध्ये तहसीलदार कार्यालयाचा कारभार सुरू असला तरी देखरेखीअभावी अनेक ठिकाणी गळती लागून गैरसोय झाली आहे, याकडे अधिकाऱ्यांकडूनही दुर्लक्ष करण्यात आले.
महानगरपालिका नव्या इमारतीमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर रिसालदार गल्लीतील जुनी इमारत तहसीलदार कार्यालयाला देण्यात आली आहे. या कार्यालयातून तालुक्याचा कारभार चालतो तसेच बेळगाव वन कार्यालयही आहे. त्यामुळे सदर कार्यालय नागरिकांच्या वर्दळीने दररोज गजबजलेले असते. तहसीलदार कार्यालयाशी संबंधित असणारे अनेक विभाग इमारतीच्या वेगवेगळ्या भागात कार्यरत आहेत. निवडणूक विभाग, रेशन कार्ड वितरण, तहसीलदार व उपतहसीलदारांचे कक्ष तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे कक्ष आहेत.
सदर इमारत जुनी झाली असल्याने अनेक ठिकाणी गळती लागली आहे. गळती निवारणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे कर्मचाऱ्यांना गळतीमध्येच कामे करावी लागत आहेत. अनेक ठिकाणी खिडक्याच्या काचा फुटल्याने पावसाचे पाणी आत शिरत आहे तर तहसीलदार कक्षाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवरून पावसाच्या पाण्याचा लोंढा वाहत आहे. यामुळे कामानिमित्त कार्यालयाला येणाऱ्या नागरिकांना पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. पायऱ्यांवरील धोका लक्षात घेत नागरिकांना ये-जा करण्यास रोखण्यात आले आहे. यासाठी त्याठिकाणी फलक टाकून रस्ता बंद केला आहे. तर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे इमारतींची दुर्दशा झाली आहे. बेळगावचे वैभव असणारी सदर इमारत आता देखरेखीअभावी जीर्ण झाली आहे. याकडे संबंधित अधिकारी लक्ष देणार का? हे पहावे लागणार आहे.









