सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तारखेत बदल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी द्यावी लागणारी नीट-पीजी परीक्षा यावर्षी 3 ऑगस्ट रोजी एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल. राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनबीई) सर्वोच्च न्यायालयाकडे परीक्षेची तारीख 15 जूनवरून 3 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयाने एनबीईची मागणी मान्य केली आहे. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. एनबीईला परीक्षेच्या तारखेसाठी आणखी कोणतीही वाढ दिली जाणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केल्यामुळे परीक्षेची तारीख पुन्हा आता पुन्हा पुढे ढकलता येणार नाही.
नीट-पीजी परीक्षा 15 जून रोजी होणार होती. या परीक्षेसाठी प्रवेशपत्र 11 जून रोजी जारी केले जाणार होते. परंतु 2 जून रोजी संध्याकाळी उशिरा वेबसाइटवर परीक्षा पुढे ढकलण्याची नोटीस जारी करण्यात आली. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी दोन शिफ्टमध्ये होणाऱ्या परीक्षेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दोन शिफ्टमधील परीक्षेमुळे प्रश्नपत्रिकेच्या काठिण्य पातळीत फरक पडतो. तसेच परीक्षेत मिळालेल्या गुणांमध्येही फरक होऊ शकतो, असा युक्तिवाद विद्यार्थ्यांच्यावतीने करण्यात आला होता.
न्यायालयीन सुनावणीनंतर 30 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने एनबीईला एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. गरज पडल्यास परीक्षा केंद्रांची संख्या वाढवता येते. परीक्षेसाठी अजूनही 2 आठवडे शिल्लक असून ते तयारीसाठी पुरेसे आहेत. तरीही, जर अधिक वेळ हवा असेल तर बोर्ड त्यासाठी अर्ज करू शकते, असे न्यायालयाने म्हटले होते.
नीट-पीजी 2025 ही परीक्षा देण्यासाठी यंदा 2 लाख 42 हजार 678 परीक्षार्थींनी आवेदनपत्रे सादर केली आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार ती एकाचवेळी घ्यायची असल्याने अधिक केंद्रे सुसज्ज ठेवावी लागणार आहेत. पुरेशा प्रमाणात केंद्रे उपलब्ध करण्यासाठी परीक्षा घेण्यास विलंब होत आहे.









