एमसीआयच्या नियमावर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब : भारतात प्रॅक्टिसकरता लागू
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
विदेशातून एमबीबीएस करण्यासाठी नीट युजी परीक्षेत पात्र ठरणे अनिवार्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचा यासंबंधीचा नियम कायम ठेवला आहे. केंद्र सरकारकडून 2018 मध्ये आणला गेलेला हा नियम विदेशात वैद्यकीय शिक्षण घेत असलेले भारतीय विद्यार्थी भारतात मेडिसीनची प्रॅक्टिस करण्यासाठी आवश्यक मापदंडांची पूर्तता करतील हे सुनिश्चित करतो. हे नियमन निष्पक्ष आणि पारदर्शक आहे आणि कुठल्याही घटनात्मक तरतुदीच्या विरोधात नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हा नियम इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्ट 1956 च्या कुठल्याही तरतुदीच्या विरोधात नाही. हा नियम कुठल्याही प्रकारे मनमानी किंवा चुकीचा नाही. नीट युजी पास करण्याची आवश्यकता ग्रॅज्युएल मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन 1997 मध्ये निर्धारित पात्रता मापदंडांना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बी.आर. गवई अणि के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने संबंधित याचिकेवर सुनावणी केली आहे. विदेशातून एमबीबीएस करत भारतात वैद्यकीय सेवा करू पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी 2018 मध्ये नीट युजी पास करणे अनिवार्य करण्यात आले होते. याचिकाकर्त्यांनी एमसीआयच्या नियमनाला आव्हान देत हे इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्ट 1956 मध्ये दुरुस्ती न करता लागू करण्यात आल्याचा युक्तिवाद केला होता. परंतु मेडिकल कौन्सिलकडे कायद्यातील कलम 33 अंतर्गत नियमन सादर करण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने मानले आहे.
नियमनात हक्षेप करण्यासाठी आम्हाला कुठलेही कारण दिसून येत नाही, असे सुनावणीदरम्यान खंडपीठाने म्हटले आहे. एकदा सूट देण्यासही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. नवे नियमन लागू झाल्यावर जर एखादा उमेदवार प्राथमिक वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी एखाद्या विदेशी संस्थेत प्रवेश घेऊ इच्छित असेल तर तो नियमनापासून सूट देण्याची मागणी करू शकत नाही. हे नियमन देशात डॉक्टर म्हणून सेवा बजावण्यासाठी आवश्यक पात्रता मापदंड निर्धारित करते. तसेच भारताबाहेर डॉक्टर म्हणून काम करण्याच्या अधिकारावर बंदी घालत नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. या निर्णयानुसार विदेशात अंडर ग्रॅज्युएट मेडिकल कोर्स करण्यासाठी इच्छुक भारतीय विद्यार्थ्यांना आता विदेशी वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी नीट युजीत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे.
एफएमजीई उत्तीर्ण होण्याची गरज
एखादा भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाची पदवी मिळवत असेल तर त्याला नीटमध्ये उत्तीर्ण व्हावे लागेल. जर एखादा विदेशी नागरिक भारतात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छित असेल तर त्यालाही नीटमध्ये भाग घेत पात्र ठरावे लागणार आहे. 2018-19 च्या सत्रापासून हा नियम लागू करण्यात आला होता. विदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम नीटमध्ये उत्तीर्ण व्हावे, असे यात म्हटले गेले होते. विदेशात वैद्यकीय शिक्षण मिळविण्यासाठी एमसीआयकडून पात्रता प्रमाणपत्र मिळवावे लागते. हे प्रमाणपत्र नीट उत्तीर्ण असलेल्यांना मिळणार आहे. जर कुणी नीट उत्तीर्ण न करता विदेशातून वैद्यकीय पदवी मिळवत असेल तर भारतात ती मान्य ठरणार नाही. तसेच विद्यार्थ्याने एमसीआयकडून पात्रता प्रमाणपत्र मिळविले नाही तर तो एफएमजीई परीक्षा देऊ शकणार नाही. विदेशातून एमबीबीएस करून आलेल्या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय सेवेचा परवाना मिळविण्यासाठी एफएमजीई परीक्षा द्यावी लागते. एफएमजीईमध्ये उत्तीर्ण होऊनच भारतात वैद्यकीय सेवा सुरू करता येते.









