सर्वोच्च न्यायालयात सुनावणी : केंद्राकडून मागविले स्पष्टीकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने नीट 2024 चा निकाल जाहीर करण्यास स्थगिती देण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करत प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांनंतर पुन्हा परीक्षा आयोजित करविण्याची मागणी करण्यात आली होती. अखिल भारतीय परीक्षा रोखू शकत नाही असे म्हणत सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायाधीश जे.बी. पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस जारी करत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
या प्रकरणी आम्ही उन्हाळी सुटीनंतर विचार करू. परंतु अखिल भारतीय परीक्षेच्या निकालाला स्थगिती देऊ शकत नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. वंशिका यादव यांनी ही याचिका दाखल केली होती. याचिकेनुसार नीट पदवी परीक्षेदरम्यान पेपर लीक होण्याचा प्रकार घडला होता. पाटण्यात अधिक चिंताजनक घटना दिसून आल्या होत्या. तेथे राज्य पोलिसांकडून याप्रकरणी अनेक जणांना अटक करण्यात आली होती असा दावा याचिकेत करण्यात आला होता.









