वृत्तसंस्था / शीमकेंट (कझाकस्तान)
येथे सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठांच्या नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप नेमबाजीत राष्ट्रीय स्पर्धेतील चॅम्पियन्स नेमबाज नीरु धांडाने सुवर्णपदक पटकाविले. तर भारताच्या अशिमा अहलावतने कांस्यपदक मिळविले. मात्र मनु भाकरकडून निराशा झाली.
महिलांच्या ट्रॅप नेमबाजीमध्ये नीरु धांडाने 43 शॉट्स नोंदवित सुवर्णपदकाला गवसणी घातली. या क्रीडा प्रकारात कतारच्या बेसील रे ने 37 शॉट्स नोंदवित रौप्य तर भारताच्या अशिमा अहलावतने 29 शॉट्स नोंदवित कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजीत मनु भाकरला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या सांघिक ट्रॅम नेमबाजीमध्ये नीरु धांडा, अशिमा अहलावत आणि प्रिती रजक यांनी चीन आणि कुवेतच्या नेमबाजांना मागे टाकत 319 शॉट्ससह सुवर्णपदक पटकाविले. कनिष्ठ महिलांच्या विभागात भारतीय महिला नेमबाजांनी दर्जेदार कामगिरी केली. महिलांच्या ट्रॅप नेमबाजीमध्ये पात्र फेरीत नीरु आणि अशिमा यांनी अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान मिळविले होते. अंतिम फेरीमध्ये सहा स्पर्धकांचा समावेश होता. गेल्या जुलै महिन्यात इटलीत झालेल्या विश्व चषक शॉट गन नेमबाजी स्पर्धेत नीरुने चौथे स्थान मिळविले होते. आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत नीरु धांडाने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती.
महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजी प्रकारात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्या मनु भाकरला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताची महिला नेमबाज इशा सिंग या क्रीडा प्रकारात 18 गुणांसह सहाव्या स्थानावर राहिली.या क्रीडा प्रकारात व्हिएतनामच्या कांस्यपदक विजेत्या ट्रिनने 29 गुण नेंदविले.
कनिष्ठ महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजी प्रकारात भारतीय नेमबाजांनी आपले पूर्ण वर्चस्व राखले होते. या क्रीडा प्रकारात भारताच्या पायल खत्रीने 36 शॉट्ससह सुवर्णपदक, नाम्या कपूरने 30 शॉट्ससह रौप्य पदक आणि तेजस्वीनीने 27 शॉट्ससह कांस्यपदक घेतले. भारताच्या या महिला नेमबाजांनी 25 मी. पिस्तुल नेमबाजी सांघिक प्रकारात सरासरी 1700 शॉट्ससह रौप्य पदक मिळविले. या क्रीडा प्रकारात कोरियाने सुवर्ण तर यजमान कझाकस्तानने कांस्यपदक घेतले.
या स्पर्धेत सोमवारी वरिष्ठ महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजी प्रकारात चीनच्या झेंगने सुवर्ण तर चीनच्या झियाओने रौप्यपदक पटकाविले. भारताच्या मनु भाकर, इशा सिंग आणि सिमरनप्रित कौर ब्रार यांनी सरासरी 1749 शॉट्स नोंदवून सांघिक गटात कांस्यपदक घेतले. या क्रीडा प्रकारात चीनने सुवर्ण तर द. कोरियाने रौप्य पदक मिळविले. भारताच्या मनु भाकरने या स्पर्धेत सुरूवातीला महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल वैयक्तिक नेमबाजीमध्ये तसेच सांघिक विभागात कांस्यपदके मिळविली. पण तिला महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजी पात्रता फेरीमध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. इशा सिंग दुसऱ्या स्थानावर राहिली होती.









