वृत्तसंस्था/ दोहा, कतार
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने अखेर नव्वदीचा टप्पा गाठण्यात यश मिळविले. येथे सुरू असलेल्या डायमंड लीगमधील टप्प्यात नीरजने हा पराक्रम केला. मात्र त्याला जर्मनीच्या ज्युलियन वेबरने त्याच्याहून सरस भालाफेक करीत सुवर्ण पटकावले. वेबरने 91.06 मी. भालाफेक केली.
27 वर्षीय नीरज दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेता असून येथील लीगमध्ये त्याने तिसऱ्या प्रयत्नात 90.23 मी. भालाफेक करीत निवडक खेळाडूंच्या यादीत स्थान मिळविले. त्याचे सध्याचे प्रशिक्षक झेकचे जॅन झेलेझ्नी यांचाही 90 हून अधिक भालाफेक करणाऱ्यांच्या यादीत समावेश आहे. असा पराक्रम करणारा नीरज हा आशियातील तिसरा तर जगातील एकंदर 25 वा खेळाडू आहे. पाकचा ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीम (92.97 मी.), चिनी तैपेईचा चाओ-त्सुन चेंग (91.36 मी.) हा टप्पा गाठणारे आशियातील अन्य दोन खेळाडू आहेत. भारताचा अन्य एक खेळाडू किशोर जेनाने 78.60 मी. भालाफेक करीत आठवे स्थान मिळविला.









