रौप्यपदकावर मानावे लागले समाधान : झेकचा जेकब वेडलेच अव्वल तर जर्मनीचा वेबर तिसऱ्या स्थानी
लांब उडीत मुरली श्रीशंकरही अंतिम फेरीसाठी पात्र : अमेरिकत 16 सप्टेंबर रोजी होणार डायमंड लीग फायनल
वृत्तसंस्था/ ज्युरिच (स्वीत्झर्लंड)
ज्युरिच डायमंड लीगमध्ये भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राला भालाफेकीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मागील आठवड्यात बुडापेस्ट येथील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरजने सुवर्णपदक पटकावले. यामुळे या स्पर्धेमध्येही त्याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. पण त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्याने 85.71 मीटर लांब भाला फेकला पण अवघ्या 15 सेंटीमीटरने नीरजची सुवर्णपदकाची संधी हुकली. झेक प्रजासत्ताकच्या जेकब वेडलेचने 85.86 मीटर लांब भालाफेक करून अव्वलस्थान पटकावले. 85.04 मीटर लांब भाला फेकणारा जर्मनीचा ज्युलियन वेबर तिसऱ्या स्थानी राहिला.
दरम्यान, डायमंड लीगचा अंतिम सामना 16 आणि 17 सप्टेंबर रोजी अमेरिकेतील युजीन येथे होणार आहे. येथेच डायमंड लीगचे जेतेपद निश्चित होणार आहे. या स्पर्धेत 6 अव्वल भालाफेकपटूंनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे, ज्यामध्ये नीरज तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या वेडलेच पहिल्या स्थानावर तर जर्मनीचा ज्युलियन वेबर दुसऱ्या स्थानावर आहे. नीरजला जुलै महिन्यात झालेल्या डायमंड लीगच्या मोनॅको लेग खेळणे शक्य झाले नाही याच कारणामुळे तो 23 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. वेडलेचचे 29 गुण असून वेबरचे 25 गुण आहेत.
तीन फाऊलनंतर नीरज दुसऱ्या स्थानी
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील यशानंतर या स्पर्धेत सहभागी झालेल्या नीरजने पहिल्या प्रयत्नात 80.79 मी. भाला फेकला. यानंतर त्याचे दोन प्रयत्न फाऊल गेले. तिसऱ्या प्रयत्नात त्याने 85.22 मी थ्रो केला पण चौथा प्रयत्न पुन्हा फाऊल गेला. यानंतर पाचव्या प्रयत्नात त्याने 85.71 मीटरची सर्वोत्तम भाला फेक केली. या स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या वेडलेचने 85.86 मी थ्रो करत यश मिळवले. नीरजला अवघ्या 15 सेमीने सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले. तिसऱ्या स्थानी राहिलेल्या जर्मनीच्या वेबरने तिसऱ्या प्रयत्नात 85.04 मीटरचा थ्रो केला. ग्रेनेडाचा स्टार खेळाडू पीटर्स अँडरसन सहाव्या स्थानी राहिला. त्याने 81.04 मीटर भाला फेकला.
दरम्यान, भारताच्या मुरली श्रीशंकरने पुरूष लांब उडी स्पर्धेत पहिल्या प्रयत्नाच 7.99 मीटर लांब उडी मारून चांगली सुरूवात केली. तो पाचव्या स्थानावर राहिला. विशेष म्हणजे, मुरलीही डायमंड लीग फायनलसाठी पात्र ठरला असून आता अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड
मागील आठवड्यात हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरजने सुवर्णपदक पटकावले होते. त्याने या स्पर्धेत 88.17 मीटरचा थ्रो केला. या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. या स्पर्धेतील कामगिरीसह तो पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी देखील पात्र ठरला आहे. आता, अमेरिकेत होणाऱ्या डायमंड लीग फायनलमध्ये त्याची कामगिरी कशी होते, याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.









