वृत्तसंस्था/ सिलेसिया
सिलेसिया डायमंड लीगमध्ये नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम अशी चुरस पहावयासस मिळणार होती. पण या स्पर्धेच्या प्रवेश यादीत त्यांचे नाव नसल्यामुळे त्यांचा मुकाबला आता पहावयास मिळणार नाही. पॅरिस ऑलिम्पिक सुवर्ण आणि रौप्य पदक विजेते अर्शद नदीम आणि नीरज चोप्रा यांची सिलेसिया डायमंड लीगमध्ये अपेक्षित लढत होणार नाही, कारण या दोघांचेही प्रवेश यादीत नाव नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नदीमने 92.97 मीटरच्या थ्रोसह सुवर्ण तर नीरजने 89.45 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत रौप्यपदक जिंकले होते. मे महिन्यात दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरजनेही 90 मीटर्सचा टप्पा गाठला. जुलै महिन्यात बेंगळुरू येथे नीरज चोप्रा क्लासिकमध्ये भाग घेण्यासाठी नदीम भारतात येण्याची अपेक्षा होती. तथापि, मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमधील सीमा तणावामुळे या कल्पनेवर जनतेची तीव्र टीका झाली आणि अखेर पाकिस्तानी थ्रोअरला आमंत्रित करण्यात आले नाही. सिलेसिया डायमंड लीगमधून दोन्ही नावे वगळण्यात आल्यामुळे, सप्टेंबरमध्ये टोकियोमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्यांची गाठ पडण्याची शक्यता आहे. नीरज हा भालाफेकचा जागतिक विजेता आहे. त्याने 2023 मध्ये 88.17 मीटरच्या थ्रोसह त्यावेळी जेतेपद पटकावले होते.









