डायमंड लीगमध्ये सलग तिसऱ्यांदा रौप्यपदक : जर्मनीच्या ज्युलियन वेबरला सुवर्णपदक
वृत्तसंस्था/ झ्युरिच (स्वीत्झर्लंड)
दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. झ्युरिचमध्ये पार पडलेल्या डायमंड लीग स्पर्धेतील अंतिम सामन्यात नीरज चोप्राला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते पण सलग तिसऱ्यांदा त्याला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. यंदाच्या स्पर्धेतही तो 85.01 मीटर लांब थ्रो करून तो दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. कट्टर प्रतिस्पर्धी जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 91 मीटर भाला फेक करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या डायमंड लीगच्या फायनलमध्ये पहिल्या प्रयत्नातच जूलियन वेबरने 91.37 मीटर अंतरावर भाला फेकला. दुसरीकडे नीरजला मात्र पहिल्या प्रयत्नात फक्त 84.35 मी अंतर कापता आले. नीरजचा दुसरा थ्रो 82 मीटरवर आला. त्यानंतर तीन प्रयत्न फाउल ठरले. दुसरीकडे, जर्मनीच्या या दिग्गज खेळाडूने दुसऱ्या प्रयत्नात 91.51 मी. भाला फेकत अव्वलस्थानावरील आपली दावेदारी आणखी भक्कम केली अन् शेवटी बाजीही मारली.
अखेरच्या प्रयत्नात नीरजची बाजी
दरम्यान, तीन प्रयत्न फाऊल ठरल्यानंतर अखेरच्या प्रयत्नात नीरजने 85.01 भाला फेकत दुसरे स्थान मिळवले. या कामगिरीसह त्याने त्रिनिदाद अँण्ड टॉबेगोच्या केशोर्न वाल्कोटला मागे टाकले. त्याने 84.95 मीटर भाला फेकला व तिसरे स्थान पटकावले. या कामगिरीमुळे डायमंड लीगमध्ये सलग तिस्रयांदा नीरजवर दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
सलग तिसऱ्यांदा रौप्यपदक
2022 मध्ये झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत नीरजने दमदार कामगिरी केली होती. तो झ्युरिचमध्ये डायमंड लीग जिंकणारा पहिलाच भारतीय ठरला होता. त्यानंतर 2023 मध्ये युजीन आणि 2024 मध्ये ब्रुसेल्समध्ये झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत त्याने दुसरे स्थान पटकावले होते. यानंतर, यंदाच्या वर्षीही आता सलग तिसऱ्यांदा त्याने या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
2025 डायमंड लीगमधील विजेते
- ज्युलियन वेबर (जर्मनी) – 91.51 मी.
- नीरज चोप्रा (भारत) – 85.01 मी.
- केशोर्न वॉल्कोट (त्रिनिदाद) – 84.95 मी.
- अँडरसन पीटर्स (गेनेडा) – 82.06 मी.
प्रतिक्रिया
यंदाच्या स्पर्धेत मी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील होतो. पण, हा दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेला. शेवटच्या प्रयत्नात मी 85 मीटर लांब थ्रो केला, यामुळे मला दुसऱ्या स्थानावर राहता आले. आता, वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करण्यासाठी 3 आठवड्यांचा कालावधी आहे. या स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.
नीरज चोप्रा, भालाफेकपटू









