वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अलीकडेच झालेल्या विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा भारताचा भालाफेकधारक नीरज चोप्राला स्वीत्झर्लंडमध्ये 12 दिवसांच्या कालावधीकरिता सराव शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने अधिकृत मान्यता दिली आहे.
2023 च्या डायमंड लिग अॅथलेटिक्स मालिकेतील अंतिम टप्पा अमेरिकेतील युगेनी येथे चालू महिन्याच्या अखेरीस होणार आहे. या स्पर्धेत नीरज चोप्रा पुन्हा सुवर्णपदकाचा वेध घेण्यासाठी जोरदार तयारी करीत आहे. दरम्यान मिशन ऑलिम्पिक सेल (एमओसी) ने चोप्रासाठी स्वीत्झर्लंडमध्ये आयोजिलेल्या 12 दिवसांचे सराव शिबिराला अधिकृत मान्यता दिली आहे. या शिबिरासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने 5.89 लाख रुपये मंजूर केले आहेत. हे सराव शिबिर 1 ते 12 सप्टेंबर दरम्यान होत आहे. डायमंड लिग स्पर्धेतील झुरीच येथे झालेल्या टप्प्यात नीरज चोप्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या हेंगझोयु आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्यासाठी 25 वर्षीय नीरज चोप्राचे उद्दिष्ट राहिल. 2023 च्या अॅथलेटिक्स हंगामातील हे शेवटची स्पर्धा राहिल.









