स्वित्झर्लंडमधील लॉसेनमध्ये शुक्रवारी स्पर्धेचे आयोजन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राला गेल्या महिन्यात धोंडशिरेची किरकोळ दुखापत झाली होती. त्यातून आता तो सावरलेला असून शुक्रवारी 26 ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमधील लॉसेन येथे होणाऱया डायमंड लीग स्पर्धेत भाग घेणार आहे.
लॉसेनमधील स्पर्धेत त्याच्याकडून चांगले प्रदर्शन झाल्यास सप्टेंबर 7 व 8 रोजी झ्युरिचमध्ये होणाऱया डायमंड लीग फायनल्ससाठी तो पात्र ठरू शकेल. तो सध्या या लीगच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. पहिले सहा क्रमांक मिळविणारे खेळाडू झ्युरिचमधील फायनल्ससाठी पात्र ठरणार आहेत. भालाफेक हा क्रीडाप्रकार सामील असलेला लॉसेनमधील डायमंड लीगचा हा शेवटचा टप्पा आहे.
अमेरिकेतील युजीन येथे 24 जुलै रोजी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप्समध्ये 24 वर्षीय चोप्राला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली होती. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने ऐतिहासिक रौप्यपदक पटकावले होते. राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होण्याच्या दोन दिवस आधी चोप्राने त्यातून माघार घेतली होती. त्याच्या मेडिकल टीमने चार आठवडय़ांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने त्याला हा निर्णय घ्यावा लागला. यानंतर त्याने जर्मनीतच त्यावर उपचार करून घेतले. लॉसेनमधील आयोजकांनी खेळाडूंची जी यादी जाहीर केली, त्यात चोप्राचाही समावेश होता. पण तो त्यात सहभागी होईल का, याबाबत साशंकता होती. आपण आता पूर्ण फिट असून शुक्रवारच्या स्पर्धेसाठी सज्ज झालोय, असे चोप्रानेच ट्विट केल्याने ही शंका दूर झाली आहे.
30 जून रोजी स्टॉकहोममध्ये झालेल्या डायमंड लीगच्या पहिल्या टप्प्यात चोप्राने दुसरे स्थान मिळवित प्रथमच पोडियमवर स्थान मिळविले होते. त्याचे या लीगमध्ये आता 7 गुण झाले असून तो चौथ्या स्थानावर आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य मिळविलेला झेकचा याकूब व्हादलेच 20 गुणांसह पहिल्या, जर्मनीचा ज्युलियन वेबर 19 गुणांसह दुसऱया व वर्ल्ड चॅम्पियन ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स 16 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे.









