माझ्या प्रामाणिकपणाविषयी प्रश्न उपस्थित केला जाताना पाहणे दु:खदायक’
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दोन वेळचा ऑलिंपिक पदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमला नीरज चोप्रा क्लासिकसाठी आमंत्रित केल्याबद्दल त्याला लक्ष्य करणाऱ्यांवर टीका केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी हे फक्त एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूला पाठवण्यात आलेले आमंत्रण होते, असे त्याने म्हटले आहे.
टोकियो ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेता आणि पॅरिस गेम्समधील रौप्यपदक विजेता असलेल्या चोप्राने आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर आरोप-टीका होत असल्याचे आणि आपल्या प्रामाणिकपणाविषयी प्रश्न उपस्थित केला जात असल्याचे पाहून दु:ख होते, असे म्हटले आहे. चोप्राने 24 मे रोजी बेंगळूर येथे होणाऱ्या नीरज चोप्रा क्लासिकच्या शुभारंभी आवृत्तीसाठी नदीमला आमंत्रित केले होते. मात्र नदीमने इतर ठिकाणी सहभागाचा हवाला देऊन येण्यास नकार दिला होता.
अर्शद नदीमला नीरज चोप्रा क्लासिकमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल खूप चर्चा झाली आहे आणि त्यापैकी बहुतेक भाग हा द्वेष आणि आरोप-टीकेचा राहिला आहे. त्यांनी माझ्या कुटुंबालाही यातून सोडलेले नाही, असे चोप्राने ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘मी सहसा कमी बोलणारा माणूस आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की, मी जे चुकीचे मानतो त्याविऊद्ध बोलणार नाही. जेव्हा माझ्या देशावरील प्रेमाविषयी प्रश्न उपस्थित केला जातो आणि माझ्या कुटुंबाचा आदर आणि सन्मानाची बाब येते तेव्हा तर मी निश्चितच बोलेन’ असे त्याने म्हटले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन दिवस आधी सोमवारी निमंत्रणे पाठवण्यात आली होती, याकडे नीरजने लक्ष वेधले आहे. मी अर्शदला एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूला दिलेले आमंत्रण या नजरेतून बोलावले होते, त्याहून जास्त काही नाही. एनसी क्लासिकचे उद्दिष्ट सर्वोत्तम खेळाडूंना भारतात आणणे आणि आपला देश जागतिक दर्जाच्या क्रीडास्पर्धांचे माहेरघर बनविणे हे आहे, असेही त्याने म्हटले आहे.









