विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेला आज प्रारंभ
वृत्तसंस्था / टोकियो
2025 च्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेला येथे शनिवारपासून प्रारंभ होत आहे. पुरूषांच्या भालाफेक प्रकारात भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राचे लक्ष पुन्हा सुवर्णपदकावर राहील. या स्पर्धेतील नीरज चोप्रा हा भालाफेक प्रकारातील विद्यमान सुवर्णपदक विजेता आहे.
बुडापेस्ट येथे 2023 साली झालेल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नीरज चोप्राने 88.17 मी.चा भालाफेक करत सुवर्णपदक मिळविले होते. आता तो जपानमधील शनिवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत भालाफेक या क्रीडा प्रकारात अधिक दर्जेदार कामगिरी करत पुन्हा स्वत:कडे सुवर्णपदक राखण्यासाठी सज्ज झाला आहे. 2023 च्या विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरूषांच्या भालाफेक प्रकारात पाकचा विद्यमान ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्षद नदीमने 87.82 मी.चा भालाफेक करत रौप्य पदक तर झेक प्रजासत्ताकच्या जेकुब व्हॅडेलेचने 86.67 मी. भालाफेक करत कांस्यपदक घेतले.
भालाफेक प्रकारातील अंतिम फेरी 18 सप्टेंबरला होणार आहे. नीरज चोप्राने विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सलग दोनवेळा सुवर्णपदक जिंकले तर तो अशी कामगिरी करणारा तिसरा अॅथलीट राहणार आहे. झेकच्या जेन झिलीझेनीने 1993 आणि 1995 साली तसेच ग्रेनेडाच्या अँडर्सन पीटर्सने 2019 आणि 2022 साली विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत सलग दोनवेळा सुवर्णपदके मिळविली आहेत.
विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निरज चोप्राच्या नेतृत्वाखालील 19 जणांचा भारतीय संघ सहभागी होत आहे. या स्पर्धेत 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच पुन्हा चोप्रा आणि अर्षद नदीब यांच्यात सुवर्णपदकासाठी चुरस पहावयास मिळेल. 2021 साली जपानमधील टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 27 वर्षीय चोप्राने सुवर्णपदक मिळविण्याचा इतिहास घडविला होता. आता निरजला पुन्हा या क्रीडा प्रकारात जपानमध्येच आपले मक्तेदारी प्रस्तापित करण्याची संधी मिळाली आहे.
विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरूषांच्या भालाफेक प्रकारात निरज चोप्रासह सचिन यादव, यशवीर सिंग आणि रोहीत यादव असे चार भालाफेक धारक सहभागी होत आहेत. भारतीय अॅथलेटिक्स संघातील अनुराणी महिलांच्या भालाफेक प्रकारात, पारुल चौधरी महिलांच्या 3000 मी. स्टिपल चेस प्रकारात, मुरली शंकर पुरूषांच्या लांबउडी प्रकारात, गुलवीर सिंग पुरूषांच्या 5000 मी. धावण्याच्या प्रकारात, प्रवीण चित्रावेल पुरूषांच्या तिहेरी उडी प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे. 33 वर्षीय अनुराणीची ही पाचवी विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा आहे. या स्पर्धेत शनिवारी पुरूष आणि महिलांच्या 35 कि.मी. चालण्याच्या प्रकारात भारताचे रामबाबू, संदीप कुमार, प्रियांका गोस्वामी भाग घेत आहेत.









