वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये जिंकले प्रथमच सुवर्ण : पाकिस्तानच्या नदीमला रौप्य : रिलेत भारतीय संघ पाचवा
वृत्तसंस्था/ बुडापेस्ट (हंगेरी)
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे तमाम भारतीयांच्या आशा पूर्ण करत भालाफेकपटू नीरज चोप्राने रविवारी मध्यरात्री देशाला वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून दिले. गेल्या वर्षी नीरज चोप्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र आपल्या भात्यात जगभरातल्या महत्त्वाच्या स्पर्धांची विजेतेपदे घेऊन बुडापेस्टला दाखल झालेल्या नीरजने जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकवून देत इतिहास घडवला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमला रौप्य तर झेक प्रजासत्ताकच्या वेल्डेचला कांस्यपदक मिळाले.
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या इतिहासात भारताला आतापर्यंत केवळ दोन वेळा पदके जिंकता आलेली आहेत. 2003 साली अंजू बॉबी जॉर्जने महिलांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. यानंतर गतवर्षी नीरज चोप्राने यूजीन येथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. यावर्षी त्याने भारतीय अॅथलेटिक्सच्या इतिहासात कधी न घडलेला पराक्रम करुन दाखवला. नीरजने दोन पदकांची कमाई केली अन् तो वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन पदके जिंकणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

गोल्डन थ्रो अन् स्टेडियममध्ये एकच जल्लोष
स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या 25 वर्षीय भालाफेकपटू नीरज्कडून पदकाची आशा निर्माण झाली होती. स्पर्धा सुरु झाल्यानंतर पहिला थ्रो फाउल ठरला. मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने 88.17 मीटर भाला फेकत आपणच दावेदार असल्याचे दाखवून दिले. यानंतर तिसऱ्या प्रयत्नात 86.32 मीटर, चौथ्या प्रयत्नात 84.64 मीटर, पाचव्या प्रयत्नात 87.73 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 83.98 मीटर अंतरावर भाला फेकण्यात यशस्वी ठरला. दुसरीकडे पाकिस्तानच्या अर्शद नदीमनेही संथ सुरुवातीनंतर पुनरागमन केले. अर्शदचा पहिला थ्रो 74.80 आणि दुसरा 82.81 मीटर होता. नदीमने पुन्हा तिसऱ्या थ्रोमध्ये 87.82 मीटरचे अंतर पूर्ण केले. अखेरपर्यंत त्याला नीरजचा टप्पा गाठता आला नाही व त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर 86.67 मीटर भालाफेक करून झेक प्रजासत्ताकच्या याकूब वेडलेचने कांस्यपदक पटकावले. दरम्यान, जर्मनीच्या वेबलरने 85.79 मीटरचा थ्रो करत चौथे स्थान मिळवले तर भारताचा किशोर जिना 84.77 मीटरच्या कामगिरीसह पाचव्या तर डीपी मनू 84.14 मीटरसह सहाव्या स्थानी राहिले. दरम्यान, नीरजच्या यशानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष साजरा केला.
नीरजची भन्नाट आकडेवारी!
जागतिक चॅम्पियनशिपमध्ये जरी नीरजने यश मिळवले असले तरी या यशावर तो समाधानी नाही. 90 मीटर भाला फेकणे हेच आपले लक्ष्य असल्याचे तो सांगतो. आत्तापर्यंत नीरजने 10 वेळा 88 मीटरहून जास्त टप्प्यावर भालाफेक केली आहे. 85 मीटरहून जास्त टप्प्यावर 26 वेळा तर 82 मीटरहून जास्त टप्प्यावर 37 वेळा भालाफेक केली आहे. यंदाच्या हंगामानंतर झालेल्या स्पर्धांमध्ये 89.94 मीटर ही नीरजची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तर सर्वात कमी लांबीचा त्याचा टप्पाही 88.13 मीटर आहे.
प्रतिक्रिया
जागतिक स्पर्धेत 90 मीटरचे टार्गेट पूर्ण करु शकलो नाही, पण सुवर्ण जिंकले हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. आगामी काळात खूप स्पर्धा आहेत, यामध्ये 90 मी. भाला फेकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. रविवारी मध्यरात्री जागे राहून सामना पाहणाऱ्या सर्व भारतीयांचे आभार.
वर्ल्ड चॅम्पियन नीरज चोप्रा
समर्पण, अचूकता आणि उत्कटता यामुळे नीरज फक्त अॅथलेटिक्समध्येच चॅम्पियन झाला नाही तर संपूर्ण क्रीडा विश्वातील अतुलनीय उत्कृष्टतेचे प्रतीक बनला आहे. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
नीरजने पुन्हा एकदा आपली मान अभिमानाने उंचावली आहे. बुडापेस्ट येथे अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड जिंकणाऱ्या सुभेदार नीरज चोप्राचे खूप खूप अभिनंदन.
भारतीय सेनादल
गोल्डन बॉयने भालाफेक स्पर्धा जिंकली. तुमच्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे आणि हा क्षण भारतीय क्रीडा इतिहासात नेहमीच लक्षात राहील.
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर
जेतेपदानंतर तगड्या बक्षीसाचा वर्षाव
या स्पर्धेत पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना बक्षीस रक्कम देखील मोठी दिली जाते. सुवर्णपदक जिंकलेल्या नीरजला 70,000 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास 58 लाख रुपये मिळाले. तर पाकिस्तानचा अर्शद दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने 35,000 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 28 लाख रुपये देण्यात आले. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षीस रक्कम देण्यात येत आहे.
तीन हजार स्टीपलचेसमध्ये पारुलने मोडला राष्ट्रीय विक्रम
उत्तर प्रदेशातील मेरठची रहिवासी असणाऱ्या पारुल चौधरीने अथक प्रयत्नातून यश संपादन केले आहे. पारुलने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम मोडला आणि 11 व्या स्थानावर राहिली. या विक्रमासह पारुल 2024 मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. पारुलने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 11 वा क्रमांक पटकावला. तिने ही शर्यत 9 मिनिटे 15.31 सेकंदात पूर्ण केली. याचवेळी, 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये ब्रुनेईच्या विन्फ्रेड यावीने 8 मिनिटे 54.29 सेकंदांसह शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. याशिवाय केनियाच्या चेपकोचने 8 मिनिटे 58.98 सेकंदात शर्यत पूर्ण करत रौप्यपदक जिंकले. त्याचवेळी केनियाचा आणखी एक खेळाडू फेथ चेरोटिचने कांस्यपदक जिंकण्यात यश मिळविले.
4×400 रिलेत भारतीय संघ पाचव्या स्थानी
आशियाई विक्रम मोडून पहिल्यांदा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा भारताचा 4×400 मीटर रिले पुरुष संघ पाचव्या स्थानावर राहिला. भारताच्या मोहम्मद अनस याहिया, अमोज जेकर, मोहम्मद अजमल वारियाथोडी आणि राजेश रमेश या चौघांनी अंतिम फेरीत 2 मिनिट 59.92 सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत अमेरिकेच्या संघाला सुवर्ण (2:57.31), फ्रान्सच्या संघाला रौप्य (2:57.31) आणि ग्रेट ब्रिटनच्या संघाला कांस्यपदक (2:58.71) मिळाले तर जमैकाचा संघाला (2:59.34) या शर्यतीत चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. त्यापाठोपाठ भारतीय संघ पाचव्या स्थानावर राहिला.
याआधी भारतीय संघाने शनिवारी हिट म्हणजे क्वॉलिफाईंग रेसमध्ये अमेरिकेनंतर दुसरे स्थान मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. यामुळे अंतिम फेरीत भारतीय संघाकडून आशा वाढल्या होत्या. परंतु फायनलमध्ये भारताला हिटमधील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.
नीरजची अशीही अभिमानास्पद कृती

जागतिक भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला आहे. स्पर्धेत विजय मिळवत नीरजनं सर्वांचीच मनं जिंकलीच, पण त्यानंतरही नीरजने केलेल्या एका कृत्यामुळे त्याने प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे. स्पर्धा जिंकल्यानंतर गोल्डन बॉयसोबत घडलेला एक प्रसंग सध्या चर्चेत आहे. नीरजने सुवर्णपदक जिंकल्यानंतर एक विदेशी चाहती हातात तिरंगा घेऊन त्याच्याकडे आली आणि राष्ट्रध्वजावरच ऑटोग्राफ मागू लागली. पण क्षणाचाही विलंब न लावता नीरजने तिला स्पष्ट नकार दिला. पण नीरजने चाहतीचं मन मात्र मोडलं नाही. त्याने तिने घातलेल्या टी शर्टच्या बाहीवर ऑटोग्राफ दिली. नीरजच्या या कृतीमुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
नीरजच्या अरशद नदीमसोबतच्या व्हिडिओची कमाल
नीरजने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून लाखो चाहत्यांची मने जिंकली. दरम्यान, सामना संपल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो केवळ भारताचाच नाही तर पाकिस्तानच्या चाहत्यांनाही या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स केले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये नीरज चोप्रा सामना संपल्यानंतर पाकिस्तानी अॅथलीट अर्शद नदीमला फोटो क्लिकसाठी बोलवत आहे. नीरज झेक प्रजासत्ताकच्या वेडलेचसोबत तिरंग्यासह फोटो क्लिक करताना दिसत आहे. दोन्ही खेळाडूंकडे आपापल्या देशाचा ध्वज होता. त्यानंतर नीरजची नजर अर्शदकडे गेली आणि त्याने अर्शदला फोटो क्लिक करण्यासाठी बोलावले. घाईघाईत अर्शदला यावेळी पाकिस्तानचा झेंडा आणता आला नाही, मात्र त्याने नीरजसोबत क्लिक केलेला फोटो मिळाला..









