वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेक धारक निरज चोप्राने 2025 च्या अॅथलेटिक हंगामाला सुवर्णपदकाने प्रारंभ केला आहे. द. आफ्रिकेतील पोश्चस्ट्रुम येथे झालेल्या निमंत्रितांच्या अॅथलेटिक्स स्पर्धेत निरज चोप्राने भलाफेक प्रकारात 84.52 मी.ची नोंद करत सुवर्णपदक मिळविले. पुरुषांच्या भालाफेक या क्रीडा प्रकारात 6 स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला होता. निरज चोप्राने द. आफ्रिकेच्या स्मिटला मागे टाकले. स्मिटने 82.44 मी. ची नोंद करत रौप्य पदक घेतले. या स्पर्धेमध्ये निरज चोप्राची कामगिरी त्याच्या यापूर्वीच्या सर्वोत्तम कामगिरीच्या तुलनेत दर्जेदार होऊ शकली नाही. भलाफेक प्रकारात चोप्राने आतापर्यंत 89.94 मी.ची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद यापूर्वी केली होती. द. आफ्रिकेचा स्मिट आणि निरज चोप्रा या दोन भालाफेक धारकांनी या स्पर्धेत 80 मी.चा पल्ला ओलांडला आहे. द. आफ्रिकेच्या डंकन रॉबर्टसनने 71.22 मी.ची नोंद करत कांस्य पदक घेतले. निरज चोप्रा सध्या झेकचे जेन झिलेझेनी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
आता डायमंड लीग सिरीज
अॅथलेटिक्स स्पर्धेतील पहिला टप्पा डोहा येथे 16 मे रोजी होणार आहे. या स्पर्धेत निरज चोप्रा दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. निरजने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण तर 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळविले आहे. भालाफेक प्रकारात 90 मी.चा टप्पा ओलांडण्यासाठी निरज चोप्राला कसून सराव करावा लागेल.









