वृत्तसंस्था/ झुरिच
नवोदित विश्वविजेता नीरज चोप्रा आज गुरुवारी येथे प्रतिष्ठित डायमंड लीगमधील पुरुषांच्या गटातील भालाफेक स्पर्धेत उतरणार असून यावेळी अपली यशाची परंपरा अखंड राखण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला जाईल. चोप्राने रविवारी बुडापेस्ट येथे 88.17 मीटर भालाफेक करून आपले पहिले जागतिक विजेतेपद पटकावले होते. 2022 च्या जागतिक स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले होते.
झेक प्रजासत्ताकचा विश्वविक्रमवीर जॅन झेलेझनी आणि नॉर्वेच्या अँड्रियास थॉर्किल्डसेन यांच्यानंतर ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेचे विजेतेपद असे दोन्ही किताब जिंकणारा चोप्रा हा इतिहासातील फक्त तिसरा भालाफेकपटू ठरला आहे. झेलेझनीने 1992, 1996 आणि 2000 मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले आणि 1993, 1995 आणि 2001 मध्ये जागतिक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. थॉर्किल्डसेनने 2008 मध्ये ऑलिम्पिक आणि 2009 मध्ये जागतिक स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते.
25 वर्षीय चोप्रा या मोसमात अपराजित राहिला आहे. त्याने त्याच्या जागतिक स्पर्धेतील विजयापूर्वी दोहा (5 मे) आणि लॉसने (30 जून) येथे झालेल्या डायमंड लीगच्या दोन्ही स्पर्धा जिंकलेल्या आहेत. विश्वविजेतेपद मिळाल्यानंतर चारच दिवसांनी नीरज चोप्रा झुरिचमधील मैदानात उतरणार असून त्याचा सामना बुडापेस्टमध्ये 86.67 मीटर भालाफेकीसह कांस्यपदक जिंकलेला झेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेजच, जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि दोन वेळा विश्वविजेता राहलेला ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स यासारख्या परिचित प्रतिस्पर्ध्यांशी होणार आहे.
बुडापेस्टमधील रौप्यपदक विजेता पाकिस्तानचा अर्शद नदीम तेवढा झुरिचमध्ये दिसणार नाही. गेल्या वर्षी डायमंड लीगचा अंतिम चषक जिंकणारा चोप्रा दोन स्पर्धांतून 16 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. वडलेच (तीन स्पर्धांतून 21 गुण) आणि बुडापेस्टमध्ये 85.79 मीटर भालाफेकीसह चौथ्या स्थानावर राहिलेला वेबर (तीन स्पर्धांतून 19 गुण) हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.
पीटर्सला या हंगामात संघर्ष करावा लागलेला असून जागतिक स्पर्धेत तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नव्हता. तो तीन स्पर्धांमधून 15 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. झुरिच फेरी ही डायमंड लीग मालिकेतील शेवटची फेरी आहे. त्यानंतर मोसमाची अखेर 16-17 सप्टेंबर रोजी यूजीन, अमेरिका येथे होणार असून या अंतिम फेरीत डायमंड लीग विजेतेपदाचा मानकरी ठरेल. गुणतालिकेत अव्वल सहा स्थानांवर असलेले भालाफेकपटूच युजिनमधील स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. चोप्राने 2022 मध्ये झुरिच येथे झालेल्या अंतिम फेरीत विजेतेपद पटकावले होते.









