वृत्तसंस्था / नवी दिल्ली
स्वीसमधील झ्युरीच येथे 27 आणि 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या 2025 च्या डायमंड लीग फायनल अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारताचा जागतिक दर्जाचा भालाफेकपटू नीरज चोप्रा पात्र ठरला आहे.
नीरज चोप्रा हा विद्यमान विश्व चॅम्पियन आहे. दरम्यान पोलंडमधील सिलेसीया येथे 16 ऑगस्ट रोजी झालेल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेतील टप्प्यात नीरज चोप्रा सहभागी झाला नव्हता तर 22 ऑगस्ट रोजी ब्रुसेल्स येथे होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेच्या टप्प्यात नीरज चोप्राच्या सहभागाबाबत अद्याप समजू शकले नाही. पण गेल्या शनिवारी पोलंडमधील झालेल्या टप्प्यानंतर घोषित करण्यात आलेल्या ताज्या मानांकन यादीनुसार नीरज चोप्राने झ्युरीचमधील फायनल स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. डायमंड लीग स्पर्धेच्या पहिल्या दोन टप्प्याअखेर नीरज चोप्राने एकूण 15 गुण मिळविले आहेत. त्याने एका टप्प्यामध्ये विजेतेपद तर दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरे स्थान मिळविले होते. भालाफेक धारकांच्या अलिकडच्या ताज्या मानांकन यादीत चोप्राने तिसरे स्थान मिळविले आहे तसेच तो वॉलकॉटच्या मागे असून वॉलकॉटने 17 गुण तर जुलीयन वेबरने 15 गुण नोंदविले आहेत. ब्रुसेल्समधील डायमंड लीग टप्प्यातील आघाडीचे सहा जण झ्युरीचमध्ये होणाऱ्या डायमंड लीग फायनल स्पर्धेसाठी पात्र ठरतील. नीरज चोप्राने अलिकडच्या कालावधीत शेवटची स्पर्धा 5 जुलै रोजी बेंगळूरमध्ये खेळली होती. या स्पर्धेत त्याने 86.18 मी.चा भालाफेक करत जेतेपद मिळविले. टोकियोमध्ये 13 ते 21 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत नीरज चोप्रा सहभागी होणार आहे.









