वृत्तसंस्था / मोनॅको
क्रिकेट, टेनिस या क्रीडा प्रकाराप्रमाणेच अॅथलेटिक क्षेत्रातही हॉल ऑफ फेमची निर्मिती करण्यात येत आहे. जागतिक अॅथलेटिक क्षेत्रात अव्वल कामगिरी करणाऱ्या अॅथलिटस्चा गौरव विश्व अॅथलेटिक्स हेरीटेज कलेक्शनच्या माध्यमाने केला जातो. जागतिक अॅथलेटिक्स क्षेत्रातील या म्युझियममध्ये विविध अॅथलिटस्च्या वस्तु ठेवण्यात आल्या आहेत. आता या म्युझियममध्ये भारताचा भालाफेकधारक निरज चोप्राच्या टीशर्टचा समावेश करण्यात आला आहे.
अॅथलेटिक क्षेत्रातील सुमारे 30 अॅथलिटस्चा विश्व अॅथलेटिक्स संघटनेतर्फे गौरव करण्यात आला आहे. 2021 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविणाऱ्या निरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये परिधान केलेल्या टीशर्टचा या म्युझियममध्ये समावेश करण्यात आला आहे. चोप्राने आपला हा टीशर्ट अॅथलेटिक्स म्युझियमला भेट म्हणून दिला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत चोप्राने रौप्य पदक मिळविले होते.









