वृत्तसंस्था/ झुरिच
स्वित्झर्लंडच्या पर्यटन खात्याने त्यांचा ‘फ्रेंडशिप अॅम्बॅसेडर’ असलेला ऑलिम्पिक आणि जागतिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा त्याच्या कामगिरीबद्दल गौरव केला आहे. 25 वर्षीय चोप्रा गेल्या महिन्यात बुडापेस्ट येथे 88.17 मीटर भालाफेक करून जागतिक विजेतेपद पटकावल्यानंतर ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धा असे दोन्ही किताब पटकावणारा इतिहासातील केवळ तिसरा भालाफेकपटू ठरला आहे.
‘भारतीय क्रीडाक्षेत्रातील दिग्गज खेळाडू नीरज चोप्रा याचा गौरव करताना आम्हाला आनंद होत आहे. नीरज इतरांना वाट खुली करून देत आहे आणि संपूर्ण पिढीला प्रेरणा देत आहे. स्वीत्झर्लंडच्या पर्यटन खात्याचा विचार करता भारतातील आमचा ‘फ्रेंडशिप अॅम्बॅसेडर’ म्हणून नीरजसोबतच्या आमच्या नात्यामुळे आम्ही खूप आनंदित आहोत. आम्ही त्याचे जागतिक विजेतेपदाबद्दल मनापासून अभिनंदन करतो आणि त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो’, असे स्वित्झर्लंड टुरिझमच्या जागतिक भागीदारी विभागाचे प्रमुख पास्कल प्रिंझ यांनी म्हटले आहे.
चोप्रा स्वित्झर्लंडमध्ये निसर्गरम्य वातावरणाचा आणि साहसी क्रीडाप्रकारांचा आनंद घेत आहे. त्याने तेथील स्कायडायव्हिंग, कॅन्यन जंपिंग आणि जेटबोटिंग इंटरलेकन, पॅराग्लायडिंग यासारख्या लोकप्रिय साहसी खेळांचा तसेच हेलिकॉप्टर टूरचा अनुभव ‘शेअर केला आहे.









