वृत्तसंस्था/ पॅरिस
सलग दोन स्पर्धांमध्ये दुसरे स्थान मिळवल्यानंतर नीरज चोप्रा पॅरिसमध्ये हंगामातील पहिले मोठे विजेतेपद जिंकण्यावर लक्ष केंद्रीत करेल. 20 जून रोजी सुपरस्टार भारतीय भालाफेकपटू आठ वर्षांनी पॅरिस डायमंड लीगमध्ये परतेल आणि उच्च दर्जाच्या क्षेत्रात खेळेल. हा 27 वर्षीय भारतीय भालाफेकपटू गेल्या वर्षी फ्रान्सच्या राजधानीतील ऑलिंपिक खेळांवर लक्ष पेंद्रीत करण्यासाठी पॅरिस डायमंड लीगमध्ये सहभागी झाला.
त्याने शेवटचा म्हणजे 2017 मध्ये ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन म्हणून पॅरिस डायमंड लीगमध्ये भाग घेतला होता आणि 84.67 मीटरच्या भालाफेकीसह पाचवे स्थान मिळवले होते. पॅरिस आयोजकांनी अद्याप स्पर्धकांची संपूर्ण यादी जाहीर केलेली नाही. परंतु त्यांनी जाहीर केले आहे की, सहभागी होणाऱ्या आणि 90 मीटरचा टप्पा आधीच ओलाडलेल्या पाच खेळाडूंमध्ये चोप्रा आणि दोन वेळचा विश्वविजेता ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स हे असतील.
पीटर्स 16 मे रोजी दोहा डायमंड लीग आणि 23 मे रोजी पोलंडमध्ये जानूझ कुसोसिन्स्की मेमोरियल स्पर्धेत चोप्रा याच्या मागे तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. चोप्राने 2025 च्या हंगामाची सुऊवात दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रूम येथे झालेल्या आमंत्रितांच्या स्पर्धेत 84.52 मीटर फेकीसह जेतेपद मिळवून केली. त्यानंतर त्याने 16 मे रोजी दोहा डायमंड लीगमध्ये 90.23 मीटर फेकीसह 90 मीटरचा टप्पा प्रथम ओलांडला. मात्र तेथे जर्मन ज्युलियन वेबरने 91.06 मीटरसह अव्वल स्थान पटकावले.
या दुहेरी ऑलिंपिक पदक विजेत्या खेळाडूने एका आठवड्यानंतर पोलंडमधील जानूझ कुसोसिन्स्की मेमोरियल स्पर्धेत वेबरच्या मागे पुन्हा दुसरे स्थान पटकावले होते. त्याने 84.14 मीटरचा सर्वोत्तम थ्रो केला होता, पण त्याच्या उच्च दर्जाच्या तुलनेत तो खूपच कमी होता. चोप्राने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पॅरिसमध्ये दुसरे ऑलिंपिक पदक जिंकताना रौप्य कमावले होते. त्याच ठिकाणी तो आता सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. पॅरिस डायमंड लीगनंतर चार दिवसांनी चोप्रा 24 जून रोजी झेक प्रजासत्ताकमधील ओस्ट्रावा येथे होणाऱ्या गोल्डन स्पाइक अॅथलेटिक्स स्पर्धेत भाग घेईल. त्यानंतर तो 5 जुलै रोजी बेंगळूरमध्ये नीरज चोप्रा क्लासिकच्या शुभारंभी आवृत्तीत सहभागी होईल. ही स्पर्धा त्याने स्वत: आयोजित केलेली आहे.









