ऑनलाईन टीम / तरुण भारत :
टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारा भालाफेकपटू नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आहे. स्वीडनमध्ये सुरु असलेल्या स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये नीरजने 89.94 मीटर लांब थ्रो केला. यापूर्वी 14 जूनला फिनलँडमधील पावो नुर्मी गेम्समध्ये 89.3 मीटर लांब थ्रो केला होता. अवघ्या 15 दिवसातच नीरजने स्वत:चा राष्ट्रीय रेकॉर्ड मोडीत काढला. पण त्याला या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकता आले नाही.
स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये ग्रेनेडाच्या पीटर्स एडरसनने सुवर्ण जिंकले. त्याने 90.31 मीटर लांब थ्रो केला. नीरज दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. नीरज चोप्राने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय विक्रम मोडला. दुसऱ्या प्रयत्नात नीरजचा थ्रो 84.37, तिसरा थ्रो 87.46, चौथा थ्रो 84.67, पाचवा थ्रो 86.67 तर सहावा थ्रो 86.84 मीटर फेकला. या सहा थ्रो मध्ये नीरजने एकही फाऊल थ्रो केला नाही.
यापूर्वीच्या पावो नुर्मी गेम्समध्ये राष्ट्रीय विक्रम मोडल्यानंतर देखील नीरजला सुवर्णपदक मिळाले नव्हते. टोकिओ ऑलिम्पिकनंतर नीरजचा हा दुसरा सामना आहे. टोकिओ ऑलिम्पिकमध्ये एथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय आहे.









