सांप्रतच्या काळात प्रदूषणाची समस्या उग्र झाल्याने अनेक लोक श्वसनाच्या विविध विकारांनी त्रस्त असल्याचे दिसून येते. वातावरणात उष्णता वाढविणाऱया विषारी वायूंचे प्रमाण वाढत आहे. असेच सुरू राहिले तर हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण इतके कमी होईल, की जीवसृष्टी धोक्मयात येईल, असा इशारा संशोधक देत आहेत. अशावेळी ऑक्सिजनचे प्रमाण सुरक्षित ठेवण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचे वेगाने ऑक्सिजनमध्ये परिवर्तन करणाऱया झाडांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. नेमके हेच उत्तरदायित्व मिलनपल्ली येथील निवासी माखन घोष यांनी स्वीकारले आहे. कडुलिंबाची झाडे मोठय़ा संख्येने लावल्यास हवेचे शुद्धीकरण वेगाने होते, असे त्यांना आढळून आले आहे. त्यामुळे त्यांनी कडुलिंबाची रोपे लावून त्यांना वाढविण्याचे जणू व्रत स्वीकारले आहे. त्यामुळे त्यांना ‘नीम मॅन’ म्हणून ओळखले जाते.
या अभियानाची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासूनच केली. घराभोवतीच्या रिकाम्या जागेत त्यांनी कडुलिंबाची रोपे तयार करण्याची रोपवाटिका सुरू केली. प्रतिदिन शेकडो रोपे ते लोकांना विनामूल्य देतात. सरकारी तसेच खासगी संस्थांनाही कोणतेही शुल्क न आकारता ते ही रोपे वितरित करतात. सिलिगुढीचे उत्तर बंगाल मेडिकल कॉलेज, सिलिगुढी रुग्णालय, पश्चिम बंगालमधील अनेक महामार्ग, सार्वजनिक उद्याने, खासगी कंपन्यांच्या बागा इत्यादींमध्ये आज त्यांनी पुरविलेली कडुलिंबाची रोपटी लावण्यात आली असून त्यातील कित्येक आता मोठीही झाली आहेत. त्यांच्या अभियानाची प्रशंसा पर्यावरणतज्ञ करीत आहेत.
कडुलिंबच का? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणतात, की कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये हे झाड टिकून राहते. याचे रोप एकदा विशिष्ट कालावधीपर्यंत जगले की स्वबळावर दीडशे वर्षांपर्यंत तग धरते. त्याला कोणतेही खत किंवा पाणी घालावे लागत नाही. किटनाशकांचीही आवश्यकता नसते. उलट याची पाने आणि बिया यांच्यापासून किटनाशके तयार केली जातात. भूमी संधारणासाठी म्हणजे जमिनीची धूप रोखण्यासाठी हा वृक्ष अतिशय उपयुक्त ठरतो. कारण त्याच्या मुळांचा विस्तार मोठा असतो. वातावरणात ऑक्सिजन सोडण्याची त्याची क्षमताही इतर सर्वसामान्य वृक्षांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे शक्मय तितक्मया ठिकाणी कडुलिंबाची झाडे लावल्यास पर्यावरणाचे संरक्षण विनासायास चांगल्यारीतीने करता येईल, असा त्यांचा विश्वास आहे. त्यांच्या कार्यात सहभागी होण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.









