महानगरपालिका-जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना आवश्यक
बेळगाव : कुत्र्यांचा नागरिकांवर हल्ला, ही आता नित्याचीच बाब झाली आहे. गेल्या आठवड्यातच एका कुत्र्याने 11 जणांवर हल्ला केला. त्यापैकी पाचजण जबर जखमी झाले. त्यानंतर पुन्हा एका व्यक्तीवर कुत्र्याने हल्ला केला. शुक्रवारी संध्याकाळी कंग्राळ गल्ली येथे कुत्र्याने कॉलेज विद्यार्थिनीवर हल्ला केला तर शनिवारी वडगावमध्ये कुत्र्याने एकावर हल्ला केला. त्यापाठोपाठ रविवारी सहा जणांवर पाळीव कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्यांमुळे नागरिकांना बाहेर पडणे भीतीदायक होऊ लागले आहे. कोठेही कुत्री दिसली की मार्ग बदलून लोक जाऊ लागले आहेत. कोठून कुत्रे येईल आणि कधी चावा घेईल, याचा नेम नाही. वडगावमध्ये रविवारी सहा जणांवर हल्ला केलेल्या कुत्र्याचा शेवट झाला.
प्राणीदया संघटना प्राण्यांना मारण्याच्या विरोधात आहे. परंतु, कुत्र्यांमुळे नागरिकांना जो त्रास होतो आहे, त्याचे काय? हा प्रश्न आहे. महानगरपालिका कुत्र्यांचा बंदोबस्त करत असली तरी प्रत्यक्षात कुत्र्यांची वाढती संख्या ही मनपालासुद्धा डोकेदुखी ठरत आहे. आता कुत्र्यांच्या हल्ल्याला नागरिक वैतागले असून यापुढे हल्ला करणाऱ्या कुत्र्याला आता आम्हीच संपवू, असे नागरिक म्हणत आहेत. दुर्दैवाने माणसांबरोबर ही कुत्री इतर पाळीव जनावरांनाही संपवत आहेत. यामध्ये जातिवंत मांजरे तसेच कोंबड्यांचाही समावेश आहे. अनेक लोकांना पाळीव प्राणी पाळण्याची हौस आहे. हौसेपोटी तसेच सुरक्षिततेपोटी लोक कुत्र्यांना पाळत आहेत. मात्र, अशा कुत्र्यांना बाहेर नेताना पट्टा बांधून न्यावे. बरेच लोक आपण पुढे जातात आणि त्यांच्या मागून कुत्रा येतो. परंतु, त्यांनी कुत्र्याला पट्टा बांधून हातात धरावे म्हणजे इतरांना त्याची भीती वाटणार नाही, अशीही मागणी होत आहे. महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने आता कुत्र्यांचे हल्ले ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. अन्यथा हा उपद्रव वाढतच राहील, अशी भीती व्यक्त होत आहे.









