प्रवासोद्योम खात्याचे संचालक डॉ. के. व्ही. राजेंद्र यांचे आवाहन : उत्तर कर्नाटकातील पर्यटनाबाबत चिंता
बेळगाव : उत्तर कर्नाटकातील पर्यटनस्थळे प्रचारामध्ये मागे पडल्याने ही अत्यंत खेदजनक बाब आहे. ही पर्यटनस्थळे जागतिक स्तरावर नोंद घेण्यासारखी आहेत. प्रवासोद्योमाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे प्रवासोद्योम खात्याचे संचालक डॉ. के. व्ही. राजेंद्र यांनी सांगितले. येथील खासगी हॉटेलमध्ये प्रवासोद्योम आणि आतिथ्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संवाद कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, बेळगावजवळ चन्नम्मा कित्तूर, नंदगड, राजहंसगड अशी अनेक प्रवासी ठिकाणे आहेत. या पर्यटनस्थळांचा जागतिक स्तरावर प्रचार होणे आवश्यक आहे.
या भागातील जनतेचे धैर्य, कार्यक्षमता आणि नैसर्गिक साधनसंपत्ती याबाबत जागृती करावी. खानापूर भागातील अरण्य प्रदेश हा तिर्थहळ्ळीपेक्षाही घनदाट आहे. यावर अधिक प्रकाश टाकला पाहिजे, असे सांगितले. बेंगळूर येथून मुंबईला जाणाऱ्या उद्योजकांची संख्या अधिक आहे. या रस्त्यानेच त्यांना जावे लागते. त्यामुळे येथील हॉटेल व्यवसायाला चालना मिळणार आहे. या भागातील कृषी प्रवासोद्यामाबरोबरच ग्रामीण भागातील प्रवासोद्योमाला प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवासोद्योम म्हणजे केवळ हॉटेल नव्हे. स्थानिक पदार्थ, आहार हेही याचा भाग आहेत. प्रवासोद्योम संदर्भातील 2024-29 चे राज्याचे धोरण तयार करून सरकारला अहवाल देणार असल्याचे सांगितले. यावेळी सांबरा विमानतळाचे संचालक त्यागराज, प्रवासोद्योम खात्याचे संचालक सौम्या, उद्योजक विठ्ठल हेगडे आदी उपस्थित होते.