नगर राजभाषा अंमलबजावणी समितीची अर्धवार्षिक बैठक उत्साहात
बेळगाव : नगर राजभाषा अंमलबजावणी समिती (बँक आणि विमा), बेळगावची अर्धवार्षिक बैठक आणि पारितोषिक वितरण समारंभ 21 रोजी हॉटेल यु.के. 27, बेळगाव येथे झाला. अध्यक्षस्थानी नगर राजभाषा अंमलबजावणी समितीच्या अध्यक्षा आरती रौरनियार होत्या.
अनिर्बन कुमार विश्वास, उपसंचालक (अंमलबजावणी), राजभाषा विभाग, गृह मंत्रालय, भारत सरकार प्रमुख पाहुणे होते. त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी इतर भाषांबरोबरच राजभाषाही वाढली पाहिजे यावर भर दिला. राष्ट्राची संस्कृती पुढे नेण्यात भाषेची भूमिका महत्त्वाची असते. भारताचा सांस्कृतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी कन्नड, मराठीसह हिंदीचा राजभाषा म्हणून वापर वाढवण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
आरती रौरनियार यांनी राजभाषा विभागाकडून जारी ‘12 प्रा’ संकल्पनेचा वापर करून हिंदीमध्ये अधिकृत काम वाढविण्याबाबत माहिती दिली. ‘प्रेरणा, प्रोत्साहन आणि सामंजस्य’ या धोरणाचा अवलंब करून आम्ही लवकरच सर्व कार्यालयीन कामकाज राजभाषा हिंदीमध्ये करू शकू, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून हिंदी अध्यापन योजना, बेळगाव केंद्राचे प्रा. डॉ. जयशंकर यादव यांनी राजभाषा विभागातर्फे आयोजित प्रबोध, प्रवीण, प्रज्ञा आणि पारंगत कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी जमलेल्या लोकांना हिंदीचा पुरोगामी वापर वाढविण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांनी सर्व केंद्र सरकारी कार्यालयातील कर्मच्रायांना माहिती देण्याचेही सांगितले. हिंदीचा वापर वाढवून राष्ट्राच्या विकासात हातभार लावण्याची संकल्पना त्यांनी मांडली.
2022-23 आर्थिक वर्षात अधिकृत भाषेच्या अंमलबजावणीसाठी सादर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होता. कॅनरा बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, बेळगाव, भारतीय जीवन बिमा निगम, डीओ, बेळगाव आणि बँक ऑफ इंडिया यांना प्रथम पारितोषिक मिळाले. स्टेट बँक ऑफ इंडिया, न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. आणि पंजाब नॅशनल बँक यांना द्वितीय पारितोषिक आणि आयडीबीआय बँक, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांना तृतीय पारितोषिक मिळाले.
कार्यक्रमाला भारतीय आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक बी. पी. रवी आणि अजित वंडकरी, द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि.चे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक; सुरेश कुमार बी. एस. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.चे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक; डी. एस. माने, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.चे विभागीय व्यवस्थापक; राजकिरण एम. बोरकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक; विकास भगोत्रा, कॅनरा बँकेचे साहाय्यक महाव्यवस्थापक; जवाहरलाल जेना आणि आणि बँक ऑफ इंडियाचे साहाय्यक महाव्यवस्थापक अरुण झा यांच्यासह विविध बँका आणि विमा कंपन्यांचे शाखा व्यवस्थापक आणि अधिकृत भाषा प्रतिनिधी उपस्थित होते. ऐश्वर्या प्रकाश, कायदा अधिकारी, राजीव रमण आणि वेद प्रकाश राजभाषा अधिकारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि संचालन करण्यात सक्रिय भूमिका बजावली.









