पुणे / प्रतिनिधी :
देशात 90 हजारांहून अधिक स्टार्टअप आहेत. त्यामध्ये तरुणांचा समावेश सर्वाधिक आहे. तसेच या क्षेत्रात 100 हून जास्त युनिकॉर्न तयार झाले असून, त्यातही तरुणवर्गच कार्यरत आहे. तरुणवर्ग हा ऊर्जेचे भांडार असून, त्यांचा वापर चुकीच्या दिशेने होता कामा नये. त्यांच्या ऊर्जेचा वापर राष्ट्रउभारणीत तसेच समाजहितासाठी व्हायला हवा. त्यामुळे तरुणांच्या ऊर्जेला नियंत्रित करत योग्य दिशा देण्याची गरज आहे, असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी येथे व्यक्त केले.
खडकी येथील सिम्बायोसिस इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् (एसआयएमएस) येथे ‘फिल्ड मार्शल माणेकशॉ मेमोरियल व्याख्यानमाले’त ‘राष्ट्रउभारणीत युवकांचे योगदान’ या विषयवार ते बोलत होते. सिंह म्हणाले, देशातील व्यवस्थापनाची (मॅनेजमेंट) ताकद ही वेगाने वाढणाऱ्या विकासाला हातभार लावणारी असली पाहिजे. देशात सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात मॅनेजमेंट असणे महत्त्वाचे आहे. जगभरात मॅनेजमेंटची मोठी गरज असून, त्याची वाढती मागणी पाहता आपल्या देशातील विद्यार्थी या क्षेत्रासाठी तयार होत कार्यरत होत आहेत. तंत्रज्ञानास प्रोत्साहन देऊन उद्योगात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे.
युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा असून, त्याआधारे अनेक कामे पूर्णत्वास जाऊ शकतात. त्यासाठी आपली संस्कृती, मूल्ये, परंपरा ही तरुणांच्या ऊर्जेसाठी नियंत्रक आणि संचालक म्हणून काम करतील. सध्या सरकारने देशात अशी परिसंस्था निर्माण केली आहे. ज्याचा फायदा घेऊन देशातील युवक आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवू शकतात. कॉर्पोरेट संस्थांमध्ये अनेकांना ताण असल्याचे जाणवते. या क्षेत्रातील लोकांची स्थिती ही प्रेशर कुकरसारखी असते. मात्र मन शांत कसे ठेवावे, हे तरुणांनी शिकले पाहिजे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्येही संयमी राहणे, ताण कमी करण्याबाबत सांगितले आहे. त्यामुळे या ग्रंथातून अशा मॅनेजमेंटचे धडे घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.