किरण गावडे यांचे प्रतिपादन : नावगे येथे मॅरेथॉन स्पर्धेचे थाटात उद्घाटन : तीन गटामध्ये स्पर्धेचे आयोजन
वार्ताहर /किणये
खेळामध्ये सातत्य ठेवले पाहिजे, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर खेळाडूंनी रोज नियमित व्यायाम करून आपले ध्येय गाठले पाहिजे. खेळामुळे शरीर सुदृढ राहते. मनुष्य आनंदी जीवन जगू शकतो. त्यासाठी खेळ महत्त्वाचे आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूही राष्ट्रीय पातळीवर चमकू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कर्नाटक प्रांत अध्यक्ष किरण गावडे यांनी व्यक्त केले. नावगे येथील सांस्कृतिक कला व क्रीडामंच यांच्या वतीने खास दीपावलीनिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमानिमित्त किरण गावडे बोलत होते.
ते पुढे म्हणाले, आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले लष्करी सेवेत अधिक प्रमाणात भरती होऊन देशाची सेवा बजावतात. अशा धावण्याच्या स्पर्धेतून या खेळाडूंना लष्करी भरतीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. ग्रामीण भागातील खेळाडूंनी आमच्या देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी त्यांना सर्व स्तरातून प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवाणी मोटणकर होते. मुलांसाठी खुला गट, मुलींसाठी खुलागट व 14 वर्षाखालील मुलांसाठी अशा तीन विविध गटांमध्ये या धावण्याच्या स्पर्धा झाल्या. फीत कापून स्पर्धेचे उद्घाटन किरण गावडे, डी. बी. पाटील, श्याम पाटील, आनंद गोरल, रमेश मंडोळकर आदींच्या हस्ते करण्यात आले. सूर्यकांत करलेकर, नागप्पा तुर्केवाडी, सातेरी कामती, मारुती हुरकाडली, मारुती हुंबरवाडी, आपुणी पाटील, विनायक पाटील, महेश पाटील आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
मान्यवरांचा सत्कार
यावेळी क्षत्रिय मराठा परिषद बेळगाव तालुका अध्यक्ष डी. बी. पाटील, प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक आर. पी. सुतार, रिया पाटील, आशीर्वाद पाटील, शिक्षक संजय पाटील व निवृत्त सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. सध्या तरुणाई व्यसनाच्या आहारी अधिक प्रमाणात जात आहे. मोबाईल व इंटरनेटचा अधिक उपयोग करू लागले आहेत. त्यामुळे धावणे स्पर्धा, कुस्ती स्पर्धा भरविणे ही काळाची गरज बनली आहे, असे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी संजू हणबर आदिंसह गावातील विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती. सूत्रसंचालन शिक्षक विनायक पाटील यांनी केले.









