कृषी खाते वेळ गेल्यानंतर लागते कामाला : शेतकऱ्यांकडून माहिती मागविणेही नितांत गरजेचे
बेळगाव : सध्या खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. शेतकरी आता वळिवाची प्रतीक्षा करत आहेत. एखादा वळीव जोरदार बरसला की शेतकरी मशागती व खरीप हंगामाच्या कामाला लागतात. त्यामुळे कृषी विभागाने आतापासून बी-बियाणांचे नियोजन करण्याची गरज आहे. वेळ गेली की नंतर बियाणे उपलब्ध करून देण्यात काहीच उपयोग नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हवी ती बियाणे देण्यासाठी आतापासून त्यांच्याकडून माहिती घेणेही तितकेच गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारी बियाणेच उपलब्ध केली जात नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना खासगी बी-बियाणे दुकाने व संस्थांकडून अधिक रक्कम देऊन बियाणे खरेदी करावी लागत आहेत. यातच ती बियाणे चांगल्या प्रतीची आहेत की नाही? हाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. इंद्रायणी, सोनम, इंटानसारख्या जातीच्या भात बियाणांची शेतकरी पेरणी करतात. पण याच जातीची भात बियाणे कृषी खाते उपलब्ध करण्यास अपयशी ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू लागला आहे. ज्या भागात जी बियाणे लागतात तीच उपलब्ध केली जात नाहीत. यामुळे कृषी खाते निष्क्रिय ठरत आहे. तेव्हा आतापासून ती बियाणे मागविण्यासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बियाणांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट
एकीकडे आसमानी संकट तर दुसरीकडे आर्थिक फटका आणि कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना महागड्या खताबरोबर आता बियाणांचे दरही काही प्रमाणात वाढल्याने नव्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शेतीत पेरणी केलेली बियाणे उगवणार की नाही, निसर्ग साथ देणार की नाही, अशा विवंचनेत शेतकरी आहेत. सध्या खरीप पेरणी तोंडावर आली आहे. काही ठिकाणी शेतीच्या मशागतीचे कामही हाती घेण्यात आले आहे. यातच बियाणांच्या दरात काही प्रमाणात वाढ केल्याने शेतकऱ्यांना काय करावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे कृषी खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मोठ्या पावसाची गरज
बेळगाव तालुक्मयात सध्या पेरणीचा हंगाम साधण्याची लगबग सुरू करण्यावर भर देण्यात येत असून खरीप पेरणीच्या कामात शेतकरी गुंतणार आहे. सध्या काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना जोराच्या पावसाची प्रतीक्षा आहे. वळिवाने जोरदार हजेरी लावली तर मशागतीच्या कामांना चालना मिळणार आहे. त्यानंतर तातडीने पेरणीकडे शेतकरी वळणार आहे. ही प्रक्रिया जरा विलंबाची असली तरी आतापासूनच शेतकऱ्यांना हवी ती बियाणे देण्यासाठी कृषी खात्याने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. बी-बियाणांबरोबरच ट्रॅक्टर व बैलजोड्यांच्या भाडेदरात वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी पेरणीपेक्षाही पैशाची जमवाजमव करण्याच्या कामात गुंतल्याचे दिसून येत आहे. सध्या बैलजोड्यांची संख्या कमी झाल्यामुळे बैलजोडी असलेल्या मालकांनी भाडे दुपटीने वाढविले आहे. दिवसाला एक हजाराहून अधिक भाडे आकारणी केली जात आहे. तरीदेखील बैलजोडी मिळण्यास तयार नाही. गेल्या काही वर्षांत बैलजोड्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. कारण ट्रॅक्टरच्या साहाय्यानेच कामे उरकत आहेत. कृषी खात्याच्या दुर्लक्षपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणारी की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आतापासून बियाणे देण्याची गरज

शेतकरी हा दरवर्षीच निसर्गावर अवलंबून असतो. दरवर्षीच तो जुगार खेळत असतो. त्यामुळे वर्षातील सर्वात मोठे हंगाम म्हणून आपण खरीप हंगामाकडे पाहतो. खरीप हंगाम जवळ येत आहे. त्यामुळे आतापासून कृषी खात्याने शेतकऱ्यांना हवी ती बियाणे देणे गरजेचे आहे. ऐनवेळी कृषी खात्याकडून हात वर केले जातात. त्याचा फटका अनेकांना बसतो. मात्र, कृषी खात्याने जर पूर्व नियोजन केल्यास त्याचा फायदा आम्हाला होऊ शकतो.
– सुरेश पाटील









